अतुल आंबी
इचलकरंजी : येथील स्टेशन रोडवरील एका हॉटेल समोर तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. संतोष उर्फ पप्पू श्रीकांत जाधव असे त्याचे नाव आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली. घटनास्थळी हल्ल्यात वापरण्यात आलेली तलवार तुटून पडली होती. या घटनेनंतर संशयितांच्या परिसरात घरावर दगडफेक आणि जाळपोळ केल्याने मोठा तणाव निर्माण झाला. रात्री या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. या प्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगार शुभम काणे याच्यासह सातजणांवर शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संतोष जाधव याच्या हॉटेलमधील एक कामगार व संशयित काणे यांच्यात वाद झाला होता. त्यात भाग घेतल्याने शनिवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास शुभम काणे, आदित्य सुतार यांच्यासह सात जणांनी तलवार, कोयता, चाकू अशी धारधार हत्यारे घेऊन दोन मोटारसायकलवर तीन-चार जण बसून स्टेशन रोडवरील हॉटेल जमजमजवळ थांबलेल्या जाधव यांच्यावर हल्ला केला. त्यामध्ये त्यांच्या डोके, चेहरा, दोन्ही हात, छातीवर सपासप वार करण्यात आल्यांने तो गंभीर जखमी होऊन जागीच कोसळला. घटनेनंतर संशयितांनी तुटलेली तलवार घटनास्थळी टाकून पलायन केले. जखमी जाधव याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.
ही माहिती समजताच परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. तेथे जमलेल्या जमावाने यातील कांही संशयितांच्या घरावर हल्ला करायचा प्रयत्न केला. तसेच जाळपोळही करण्यात आली. त्यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. त्यामुळे परिसरातील पोलीस ठाण्यांकडून जादा पोलीस कुमक मागवण्यात आली. दरम्यान पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पुढील तपासाच्या सूचना दिल्या. संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना झाली आहेत. आयजीएम रुग्णालयात शवविच्छेदन करून रविवारी सकाळी ९ वाजता पंचगंगा नदीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तेथेही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.