- सदानंद सिरसाट
अकोला : निकृष्ट बीटी बियाण्यांमुळे गतवर्षी कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेला असताना यंदाही निकृष्ट बियाण्यांची विक्री होत असल्याचे उघडकीस आले आहे. प्रयोगशाळेतील चाचणीत तीन कंपन्यांचे बीटी बियाणे सदोष आढळून आल्याने संबंधित कंपन्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.यंदा बोंडअळी रोखण्यासाठी बीटी कापूस बियाण्यांची पेरणीपूर्वीच काटेकोर तपासणी करण्याचा आदेश शासनाने दिला असल्याने मे महिन्यात बीटी कापूस बियाण्यांचे नमुने घेण्यात आले. त्यांची तपासणी नागपूर येथील प्रयोगशाळेत करण्यात आली. त्यामध्ये तीन बियाणे उत्पादक कंपन्यांच्या बियाण्यांचे नमुने अपयशी ठरले आहेत. दोन कंपन्यांच्या बीटी बियाण्यांमध्ये बोंडअळी रोखणाऱ्या जीन्सचे प्रमाण अत्यल्प आढळले आहे, तर एका कंपनीच्या बियाण्यामध्ये रेफ्युजी बियाण्यात बीटीचे प्रमाण अधिक आढळले. त्या बियाण्यांच्या वापर झालेल्या भागात बोंडअळीच्या धोका होण्याचा संभव आहे.कंपन्यांचे सरकारला आव्हानगेल्या वर्षी राज्यभरात कापूस पिकावर बोंडअळीचा प्रकोप झाला. पीक नुकसानासाठी सरकारने घोषित केलेली मदत अद्यापही शेतकºयांच्या पदरात पडली नाही. बियाणे कंपन्या, विमा कंपन्या आणि शासनाची मिळून हेक्टरी ३६ हजार रुपये देत असल्याचे सरकारने उत्साहाच्या भरात जाहीर केले आहे. मात्र, कापूस बियाण्यातील बीटी तंत्रज्ञान विदेशी कंपनीकडून घेतले असल्यामुळे तंत्रज्ञानाच्या अपयशाची भरपाई आम्ही करणार नाही, असा पवित्रा घेत बियाणे कंपन्यांनी सरकारच्या दाव्यालाच आव्हान दिले आहे.सत्या, राशी, तुलशी कंपन्यांचा समावेशबियाणे नमुन्यात बीटी जीन्सचे प्रमाण कमी आढळल्याने हैदराबाद येथील सत्या अॅग्रो बायोसीड, कोईम्बतूर येथील तुलसी सीड्स, तर रेफ्युजीमध्ये बीटी बियाणे अधिक आढळल्याप्रकरणी गुंटुर येथील राशी सिड्सला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी जी.आर. बोंडे यांनी सात दिवसांत कंपनीला खुलासा मागवला आहे. एसएसपी खताचे नमुने अपयशी ठरल्याप्रकरणी रामा फॉस्फेट, इंदूर, निरमा लिमिटेड अहमदाबाद या कंपन्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.