मुंबई- सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी अर्थसंकल्पाबाबत व्यक्त केली. आज देशात भाजप सरकारबद्दल सर्वाधिक नाराज असलेला वर्ग हा शेतकरी आहे. देशभरात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबायला तयार नाहीत. हा वर्ग आता संघटीत झाला आहे. तो अंगावर आला, तर आपली २०१९ ला काही धडगत नाही. असे वाटल्याने भाजप सरकारने या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना आम्ही भरपूर काही दिल्याचे चित्र रंगवले आहे. परंतु, ते खोटे आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या हंगामात रब्बी पिकांना आम्ही दीडपट हमीभाव दिल्याचे सभागृहात सांगितले. पण, मंत्री जेटली किंवा कृषीमूल्य आयोगाने कुठल्या शेतकºयाला हा दीडपट हमीभाव दिला हे सिद्ध करुन दाखवावे. आम्ही शेतकºयांचे प्रश्न मांडायचे बंद करतो. शेतकºयांना आता कुठल्याच पिकाला हमीभाव मिळत नाही आणि सरकार मात्र, तो वाढवून देण्याच्या गप्पा मारत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीमध्ये हमीभाव दीडपट करण्याची घोषणा केली होती. चार वर्षे त्याबद्दल सरकारने काहीच केले नाही आणि आता निवडणुका समोर दिसू लागल्याने सरकारला शेतकºयांची आठवण झाली आहे. काँग्रेसच्या काळात तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सुमारे ७३ हजार कोटींची कर्जमाफी दिली होती. भाजप सरकारने राज्य सरकारांशी सल्लामसलत करुन १ लाख कोटी रुपयांची कर्जमाफी दिली असती, तर त्यातून शेतकºयांना काही दिलासा मिळाला असता. पण, शेतकºयाचे मूलभूत प्रश्न न सोडविता फसव्या घोषणा करण्यात भाजप सरकारला जास्त रस आहे. सिंचनासाठी २६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. फूड प्रोसेसिंगसाठी १४०० कोटींची तरतूद केली आहे. भारत सारख्या खंडप्राय देशात एका रस्त्याला दहा-दहा हजार कोटी रुपयांचे बजेट दिले जाते. मात्र, शेतीतील पायाभूत सुविधांसाठी निधीची तरतूद करताना कसा हात आखडता घेतला जातो. त्याचे हे उदाहरण आहे
Budget 2018: सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली - राजू शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2018 4:57 PM