- दयानंद पाईकराव/आनंद शर्मा नागपूर : अर्थ आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी लोकसभेत सादर केलेल्या बजेटमध्ये रेल्वेचे जाळे मजबूत बनविण्यावर भर दिला आहे. त्यामुळे विदर्भातील विविध रेल्वे प्रकल्पांना भरघोस निधी मिळाला आहे. यात महत्त्वाच्या २७० किलोमीटर लांबीच्या वर्धा-यवतमाळ-पुसद-नांदेड रेल्वेमार्गासाठी २०१९-२० साठी ३५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या मार्गाला गती देण्यासाठी ‘लोकमत एडिटोरियल बोर्डा’चे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच दरवर्षी या प्रकल्पासाठी भरघोस निधीची तरतूद करण्यात येत असून या अर्थसंकल्पातही ३५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.वर्धा-यवतमाळ-नांदेड या प्रकल्पाशिवाय बडनेरातील रेल्वे वर्कशॉपसाठी १५१ कोटी ६३ लाख ७२ हजार रुपये देण्यात आले आहेत. ७८.७० किलोमीटर लांबीच्या वर्धा-नागपूर चौथ्या लाइनसाठी १३५ कोटी रुपये, ७६.३ किलोमीटर लांबीच्या वर्धा-नागपूर थर्ड लाइनसाठी ११० कोटी, १३२ किलोमीटर लांबीच्या वर्धा-बल्लारशाह थर्ड लाइनसाठी १६० कोटी रुपये, इटारसी-नागपूर थर्ड लाइनसाठी १८५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. अर्थसंकल्पात अमरावती रेल्वे स्थानकावर नवी टर्मिनल इमारत तयार करण्याची घोषणा करण्यात आली असून प्राथमिक स्तरावर त्यासाठी केवळ एक हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर १६५ किलोमीटर लांबीच्या राजनांदगाव-नागपूर थर्ड लाइनच्या कामासाठी ३५० कोटी रुपये, १४९.५२ किलोमीटर लांबीच्या छिंदवाडा-नागपूर ब्रॉडगेज लाइनसाठी १२५ कोटी रुपयेमिळाले आहेत. ४९.५ किलोमीटर लांबीच्या वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गासाठी २९.९० कोटी रुपये देण्यात आले. गोंदिया-जबलपूर (बालाघाट, कटंगीसह) रेल्वेमार्गासाठी १२५ कोटी रुपये, छिंदवाडा-मंडला फोर्ट रेल्वेमार्गासाठी १५० कोटी रुपये, गोंदिया येथील डेमू शेडसाठी १.१६ कोटी, वर्धा रेल्वे स्थानकावर प्लॅटफार्मवर वॉशेबल अॅप्रानसाठी ५० लाख रुपये, तिगाव-चिचोंडा थर्ड घाट लाइनसाठी ३५ कोटी रुपये, वर्धा-चितोडा सेकंड कॉर्ड लाइनसाठी १ कोटी रुपये, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील ५० रेल्वे गेटवर रिमोट टर्मिनल व ईएलडी इक्विपमेंट सिस्टीमसाठी ४ कोटी रुपये, १५ रेल्वे गेटवर इंटरलॉकिंगसाठी ८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
Budget 2019: अर्थसंकल्पात वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गासाठी ३५० कोटींची तरतूद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2019 4:59 AM