मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे वार्षिक बजेट ५० कोटी रुपयांच्या आसपास असताना ३०० कोटींची उधळपट्टी प्रचारावर होणार, असे म्हणणे चुकीचे असल्याचे स्पष्टीकरण महासंचालनालयाचे सचिव आणि महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी आज दिले.प्रसिद्धिमाध्यमांद्वारे जनजागृती करताना, जनतेपर्यंत योजनांची माहिती पोहोचवताना व्यावसायिक संस्थांचे साहाय्य घेण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या जुन्या निवडसूचीची मुदत संपल्याने नवीन निवडसूची तयार करण्यात आली आहे तसेच अद्याप निवडसूचीवरील संस्थांना कोणतेही काम देण्यात आलेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. शासनाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून विविध माध्यमांचा उपयोग केला जातो. अशा पद्धतीने लोकहिताच्या निर्णयांची आणि योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे म्हणजे प्रचार नाही. याचा सोशल मीडियातील टीकेशी संबंध आहे असे म्हणणे अत्यंत चुकीचे आहे. ही महासंचालनालयाची नियमित स्वरूपाची प्रक्रिया असल्याचे ब्रिजेश सिंह यांनी म्हटले आहे.
‘बजेट ५० कोटींचे, उधळपट्टी ३०० कोटींची कशी?’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 3:42 AM