मुंबई : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प फुटल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केल्यावर मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प फुटलाच नसल्याचा खुलासा केला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार अर्थसंकल्प सादर करत असताना त्यांच्या ट्विटरवर मुद्दे टाकले जात आहेत. यामध्ये 15 मिनिटांचा फरक असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
सोशल मिडीयाच्या माध्यमातून विरोधक लगेचच टीका करतात. विरोधकांचा काहीतरी गैरसमज झाला असून मुनगंटीवार यांच्या अकाऊंटवर मुद्दे टाकले जात आहेत. यापैकी एकही पोस्ट मुनगंटीवार यांनी जाहीर करण्याआधी टाकली जात नाहीय. यामध्ये काही मिनिटांचे अंतर आहे. विरोधकांनीही हे तंत्रज्ञान आत्मसात करावे, असा टोला त्यांनी लगावला.
विधानसभेत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारअर्थसंकल्प मांडत असताना, त्या आधीच त्यांच्या ट्विटर अकाऊंटर अर्थसंकल्पाचे मुद्दे तयार करून ग्राफीक्ससह प्रसिद्ध झाल्याने विधानपरिषदेत गोंधळ उडाला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावर आक्षेप घेतल्यानंतर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. अर्थमंत्र्यांच्या ट्विटरवरून अर्थ संकल्प फुटला असून अर्थमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
सरकारला सत्तेची धुंदी चढली आहे. राज्याचा अर्थसंकल्प फुटला आहे. हा सभागृहाचा आणि सदस्यांचा अपमान असल्याची टीका अजित पवार यांनी केली. मुनगंटीवार जेव्हा अर्थसंकल्प वाचत होते त्यावेळी ते ट्विट करताना दिसले नाहीत. मग त्यांच्या नावाने कोण ट्विट करत होते. याचा अर्थ असा होते की, अर्थसंकल्प फुटला आहे, असेही पवार म्हणाले.