राज्य सरकारने आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये महिला, शेतकरी, तरुणांसाठी मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या. यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा थापांचा अर्थसंकल्प असल्याची टीका केली होती. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे.
शेतकरी, महिला, युवा मागासवर्गीय अशा सर्व घटचकांना समर्पित असा हा अर्थसंकल्प आहे. उद्धव ठाकरे म्हणाले हा थापांचा अर्थसंकल्प आहे. आम्ही म्हणतो की हा थापांचा नाही तर मायबापांचा अर्थसंकल्प आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज देणारा निर्णय घेणारा, कापूस सोयाबीन उत्पादकांना मदत करणारा, महिलांना योजना आणणारा, तरुणांना रोजगार देणारा अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे, असे फडणवीस म्हणाले.
विरोधी पक्षाचे लोक इथे बोलत होते. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर नूर नव्हता. तो उतरलेला होता. त्यांच्या बोलण्यात जोर नव्हता. हा अर्थसंकल्प महाराष्ट्रात एक नवा इतिहास तयार करणारा आहे. हा अर्थसंकल्प आम्ही पूर्ण करून दाखवू. हा निवडणुकीचा नाही तर निर्धाराचा अर्थसंकल्प आहे, असे उत्तर फडणवीस यांनी दिले.
जयंत पाटील किंवा विरोधकांचे नेते बजेटवर काय बोलायचे हे आधीच लिहून आणतात. आम्ही कसाही अर्थसंकल्प मांडला असता तरी ते तेच बोलले असते, असा टोलाही त्यांनी लगावला.