Budget Session 2023 : कोणत्या सरकारच्या काळात किती शेतकरी आत्महत्या? अजित पवारांनी आकडेवारीच मांडली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 04:02 PM2023-03-10T16:02:37+5:302023-03-10T16:03:30+5:30
Maharashtra Politics: 'शिंदे-फडणवीस सरकारच्या सात महिन्यांच्या काळात 1023 शेतकरी आत्महत्या.'
Maharashtra Budget Session : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. अजित पवारांनी पीक विम्यासह शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न मांडला. यावेळी त्यांनी कोणत्या सरकारच्या काळात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, याबाबत आकडेवारीच दाखवली.
अधिवेशनात बोलताना अजित पवार म्हणाले, '2014 ते 2019 काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. या वाच वर्षात 5061 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यानंतर 2019 ते 2021 काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 1660 आणि एकनाथ शिंदे आल्यापासून फक्त 7 महिन्यांमध्ये 1023 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मी तुलना करत नाहीये, पण शेतकरी आत्महत्या होणे वाईट आहे.' असं अजित पवार म्हणाले.
ते पुढे म्हणतात, 'कोणत्याच मुख्यमंत्र्याला असं वाटत नाही की, आपल्या काळात शेतकऱ्यांनी आत्महत्या काराव्यात. पण, यातून काहीतरी ठोस मार्ग काढण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी ही आकडेवारी अगदी बोलकी आहे. पीक कर्ज नाही, विम्याची आणि सरकारची मदत नाही. अशा अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत.'
'आजही दररोज सरासरी 8 शेतकरी आत्महत्या करत आहे. मराठवाड्यात गेल्या दोन महिन्यात 62 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, तर एकट्या बीड जिल्ह्यात 22 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यावेळी म्हणायचे की, 302 चा गुन्हा दाखल करा. मात्र 302 चा गुन्हा दाखल करून उपयोग नाही. शेतकरी आत्महत्या थांबण्यासाठी योग्य मार्ग काढण्याची गरज आहे. यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा,' असंही ते म्हणाले.