लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या, सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी २७ फेब्रुवारी रोजी लेखानुदान अर्थात अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार आहे.
विधिमंडळ सचिवालयाने निश्चित केलेल्या कामकाजानुसार २६ फेब्रुवारीला अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सन २०२३-२४ या वर्षाच्या पुरवणी मागण्या मांडण्यात येतील. भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी तसेच माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव मांडून कामकाज संपेल. २७ फेब्रुवारीला सकाळी पुरवणी मागण्यांवर चर्चा होऊन त्या मंजूर केल्या जातील. दुपारी दोन वाजता सन २०२४-२५ या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येईल. अधिवेशनाच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी अंतरिम अर्थसंकल्पावर चर्चा होऊन तो मंजूर केला जाईल.
मराठा आरक्षण आंदोलनाचे पडसाद?मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने नुकतेच विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलाविले होते. त्यात मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. मात्र, सगेसोयरे अधिसूचना, कायदा-सुव्यवस्थेवरून विरोधकांचा निशाणा साधण्याचा प्रयत्न कुणबी जात प्रमाणपत्र मिळालेल्या व्यक्तींच्या सगेसोयरे यांनाही प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्याचे पडसाद अधिवेशनात उमटण्याची चिन्हे आहेत.