मुंबई - सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्प फोडला असल्याचा आरोप होत असतानाचा आता या विषयाला नवीनच वळण लागले आहे. शिवसेना - भाजपच्या श्रेयवादानं अर्थसंकल्प फुटला असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला आहे. अर्थसंकल्पाचे श्रेय मुनगंटीवार यांना मिळावा म्हणून घाईघाईने आधीच ट्विट करण्यात आल्याचे पवार म्हणाले.
मागच्या अर्थसंकल्पावेळी वरच्या सभागृहात शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मुनगंटीवार यांच्या आधी अर्थसंकल्प सादर केला. त्यामुळे त्यांच्या नावाच्या हेडलाईन माध्यमातून झळकल्या आणि अर्थसंकल्पाचे श्रेय सेनला मिळाले. मात्र यावेळी पुन्हा सेनला श्रेय जाऊ नयेत म्हणून घाईघाईने मुनगंटीवार यांच्या ट्विटवर आधीच अर्थसंकल्पाचे मुद्दे टाकण्यात आल्याने, अर्थसंकल्प फुटला असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे.
पक्षहितासाठी ज्यांनी आपल्या आयुष्याची इतकी वर्ष घालवली अशा निष्ठावंतांना हे भाजप सरकार डावलतं. सरकारच्या अशा धूर्तपणाचा निषेध केला पहिजे. 'आयाराम गयाराम' संस्कृतीचा धिक्कार असो, असेही पवार म्हणाले.