मुंबई : आगामी आषाढी एकादशीला विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी येणार्या लाखो भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी पंढरपूरमध्ये तात्काळ पुरेशी शौचालये बांधा व या कामाचे नियोजन करण्यासाठी तेथील जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बैठक घ्यावी, असे आदेश उच्च न्यायालयाने गुरूवारी दिले़ न्या़ अभय ओक यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले़ या कामावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी उच्चपदस्थ अधिकार्याची नेमणूक करावी व हे काम युद्धपातळीवर करून घ्यावे़ तसेच येत्या महिन्याभरात झालेल्या कामाचा तपशील जून महिन्यात सादर करावा, असेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे़ देव दर्शनसाठी पंढरपूरमध्ये वर्षाकाठी लाखो भाविक येतात़ मात्र तेथे पुरेशी शौचालये नसल्याने भाविक नाईलाजाने उघड्यावर व नदीच्या पात्रात प्रात:र्विधी उरकतात़ याने चंद्रभागा नदीचे पाणी दूषित होते़ शिवाय भाविकांची विष्ठा उचलण्याचे काम कामगारांकडून केले जाते़ हे गैर असून यावर बंदी आणावी व पंढरपूरमध्ये पुरेशी शौचालये उभारावीत, अशी मागणी करणारी जनहित याचिका मानवी विष्ठा वाहतूक विरोधी संघटनेचे अध्यक्ष संदीप जेठे यांनी अॅड़ असिम सरोदे यांच्यामार्फत दाखल केली आहे़ या याचिकेवरील सुनावणीत न्यायालयाने गेल्या महिन्यात पंढरपूरमध्ये शौचालये बांधण्यासाठी पाच कोटी रूपयांचा निधी तात्काळ देण्याचे आदेश शासनाला दिले होते़ मात्र शासनाने यासाठी काही वर्षांपूर्वीच तब्बल २१ कोटी रूपयांचा निधी पंढरपूरला दिला आहे़ तसेच येथील काही भूखंड परिवहन महामंडळ व रेल्वेच्च्या ताब्यात असल्याने तेथे त्यांच्या परवानगीशिवाय शौचालये बांधता येत नाही, असे अॅडव्होकेट जनरल डी़ जे़ खंबाटा यांनी न्यायालयाला सांगितले़ (प्रतिनिधी)
आषाढी वारीपूर्वी पंढरपुरात पुरेशी शौचालये बांधा
By admin | Published: May 09, 2014 1:02 AM