नवी मुंबई : राज्यातील औद्योगिकीकरणाला चालना देताना कामगारांच्या हिताकडे दुर्लक्ष केले जाणार नाही. कष्टकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. २०१९ पर्यंत राज्यातील कामगारांसाठी तब्बल ५ लाख घरे उलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासन कामगारमंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांनी दिले आहे. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने मुंबई एपीएमसीमध्ये माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या ३५व्या पुण्यतिथीनिमित्त कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कामगारमंत्र्यांनी माथाडींचे सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. २५ सप्टेंबरला अण्णासाहेब पाटील जयंतीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे पुनरुज्जीवन केले जाईल, असे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता करून महामंडळाला २०० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. याशिवाय या योजनांच्या लाभासाठी उत्पन्नाची अट ४५ हजार रुपयांवरून ६ लाख रुपये करण्यात आली आहे. माथाडी बोर्डाच्या अध्यक्षांची व सदस्यांची नियुक्ती पुढील ९० दिवसांमध्ये पूर्ण केली जाईल. बोर्डामध्ये कर्मचारी भरती करताना कामगारांच्या मुलांनाच प्राधान्य देण्यात येईल. माथाडी कामगारांचे सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यात येतील, असे आश्वासनही त्यांनी दिले. तर, माथाडी नेते नरेंद्र पाटील व शशिकांत शिंदे यांनी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधले. कार्यक्रमाला माजी मंत्री गणेश नाईक, आ. संदीप नाईक, महापौर सुधाकर सोनावणे, चंद्रकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कामगारांसाठी राज्यात ५ लाख घरे बांधणार
By admin | Published: March 24, 2017 1:52 AM