गृह राज्यमंत्र्यांची घोषणा : सरकार करणार जनजागृती
मुंबई : राज्यातील शहरी व ग्रामीण भागात आकर्षक घरांचे आमिष दाखवून विकासक दिशाभूल करणाऱ्या खोट्या जाहिराती करु न सामान्यांना फसविणारे बिल्डर आणि त्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर मोक्काअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येतील, असे गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले. भाजपाचे प्रशांत ठाकूर यांनी या बाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना पाटील यांनी सांगितले की, नवी मुंबई परिसरात अशा प्रकारच्या १२५ हून अधिक फौजदारी गुन्हे संबंधित बिल्डरांवर दाखल करण्यात आले आहेत. मात्र, यापुढे मोक्कांतर्गत कारवाई करण्यासाठी लवकरच कायद्यात सुधारणा करण्यात येईल. मुंबई, नवी मुंबई , रायगड व ठाणे जिल्ह्यातील बिल्डरांकडून अशी फसवणूक मोठ्या प्रमाणात केली जात असून १०० हून अधिक तक्रारी आपल्याकडेच आलेल्या आहेत, असे ठाकूर म्हणाले. भाजपाचे आशिष शेलार यांनी ही संघटित गुन्हेगारी असल्याने मोक्का लावणेच योग्य राहील, त्यामुळे अशाप्रकारे खोट्या जाहिराती देऊन फसवणूक करणाऱ्या बिल्डरांबरोबर त्यांना मदत करणार्या अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. आशीष शेलार यांनी ही सर्व संघटीत गुन्हेगारी असून संबंधित अधिकाऱ्यांवरही मोका कायदा लावा अशी मागणी केली. (विशेष प्रतिनिधी)सरकार करणार १ कोटींच्या जाहिराती या प्रकारात सरकारनेही संबंधित बिल्डरांविरोधात कारवाई करण्याबरोबरच जनतेत जनजागृती करण्यासाठी राज्य सरकार प्रसारमाध्यमांमध्ये जाहिराती देऊन संबंधित बिल्डरांविरोधात जनजागृती करणार आहे. त्यासाठी १ कोटी रुपये खर्च करण्यात येतील, असे राज्यमंत्री म्हणाले.