मुंबई : मुंबईतील म्हाडाच्या मालकीच्या जुन्या इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. येथील झवेरी बाजारातील छिपी चाळ येथील इमारत क्रमांक ५०-५२ मधील चौथ्या मजल्याचा फ्लोरिंग स्लॅब थेट तळमजल्यापर्यंत कोसळल्याचा घटना शुक्रवारी सकाळी घडली. या दुर्घटनेत डागडुजीचे काम करणारे ४ मजूर गाडले गेल्याची माहिती उशिरापर्यंत कळाली होती. अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित इमारतीच्या डागडुजीचे काम सुरू होते. त्यामुळे इमारतीमधील भाडेकरूंनी घरांचा ताबा सोडला होता.पाच मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावर संबंधित म्हाडा कंत्राटदाराचे कामगार टेकू लावण्याचे काम करत होते. त्याचदरम्यान सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास चौथ्या मजल्याचा फ्लोरिंग स्लॅब अचानक कोसळला. या दुर्घटनेत सर्वच कामगार थेट तळ मजल्यापर्यंत आलेल्या ढिगा-याखाली अडकले. यातील ८ कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. मात्र प्रत्यक्षदर्शी तानाजी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार कामगारांशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांचे मोबाईलही बंद येत आहेत. त्यामुळे संबंधित कामगार दुर्घटनेदरम्यान पळून गेले, की ढिगा-याखाली अडकले आहेत, याचा अधिक शोध तपास यंत्रणा घेत आहेत...........................या प्रश्नांचे उत्तर म्हाडा देणार का?म्हाडा प्रशासनाकडून या इमारतीच्या डागडुजीचे काम सुरू होते. दरम्यान, इमारत धोकादायक नसल्याची माहिती स्थानिक नगरसेवक आकाश पुरोहित यांनी दिली आहे. जर इमारत धोकादायक नव्हती, तर साध्या डागडुजीच्या कामादरम्यान थेट फ्लोरिंग स्लॅब कसा कोसळला? हा प्रश्न निर्माण होतो. शिवाय या दुर्घटनेची जबाबदारी ठरवून कोणत्या अधिका-यांवर म्हाडा कारवाई करणार? असा सवालहीयावेळी उपस्थित केला जात आहे.
मुंबईत झवेरी बाजार येथे इमारतीचा भाग कोसळला, 7 मजुरांची सुखरूप सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 6:14 PM