ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. ४ - ठाण्यातील बी कॅबिन परिसरात ५० वर्ष जुनी तीन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना मंगळवारी पहाटे घडली. या घटनेत १२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सात रहिवासी जखमी झाले आहेत.
बी कॅबिन परिसरात कृष्ण निवास ही जुनी इमारत असून महापालिकेने या इमारतीला धोकादायक जाहीर केले होते. महापालिकेने नोटीस बजावल्यावर या इमारतीतील काही कुटुंब अन्यत्र स्थलांतरित झाले असले तरी पाच कुटुंबांनी ही इमारत सोडली नाही व ते इमारतीमध्ये राहत होते. मंगळवारी पहाटे अडीचच्या सुमारास इमारत कोसळली. अग्निशमन दल व एनडीआरएफचे ५० जवानांनी घटनास्थळी बचाव मोहीम राबवली. सकाळी अकरा वाजता बचाव कार्य संपुष्टात आले. गेल्या १० दिवसात इमारत कोसळण्याची ही दुसरी घटना आहे. याआधी ठाकुर्ली येथे इमारत कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला होता.
पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. ठाणे व परिसरात क्लस्टर विकास योजनेची आवश्यकता असून सत्तेवर आल्यापासून शिवसेनेचे स्थानिक क्लस्टर विकास योजनेवर काहीच बोलत नाही असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. शहरातील सर्व जुन्या इमारतींचे सर्वेक्षण करावे अशी मागणीही आव्हाड यांनी केली आहे.
भट कुटुंबावर काळाचा घाला
कृष्णा निवास या इमारतीमध्ये सुभराव भट, मीरा भट व त्यांच्या दोन मुली रचिता व रश्मी असे चौघा जणांचे कुटुंब राहत होते. सोमवारची रात्र या कुटुंबासाठी काळरात्र ठरली. या दुर्घटनेत भट कुटुंबातील चौघांचाही मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत
सुभराव भट (वय ६४), मीरा भट (वय ५८), रश्मी भट (वय २५), अरुण सावंत (वय ६२), प्रिया पटेल (११ वर्ष), भक्ती सावंत (वय ३०) अनन्या खोत (वय ७ वर्ष), रामचंद्र भट (वय ६२ वर्ष), मंदार नेने ( वय १७ वर्ष), रचिता भट (वय २५ वर्ष), अमित सावंत (वय ४०), महादेव बर्वे (वय ६२)