कांता हाबळे,नेरळ - कल्याण राज्यमार्गापासून काहीच अंतरावर आदिवासी लोकवस्ती आहे. ही जमीन आदिवासी बांधवांची असली तरी गेल्या काही वर्षांपासून याठिकाणी बिगर आदिवासी लोकांनी अतिक्रमण केले आहे. याठिकाणी १०० हून अधिक चाळी उभारण्यात आल्या असून बिगर आदिवासी लोक याठिकाणी वास्तव्य करीत आहे. नेरळ परिसरातील डोंगर फोडून या बैठ्या चाळी बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे अतिवृष्टीत त्यांना धोका उद्भवू शकतो. इतक्या मोठ्या संख्येने याठिकाणी चाळी बांधण्यात आल्या असल्या तरी महसूल विभागाचे दुर्लक्ष झाल्याने आदिवासी बांधवांकडून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे एखादीदुर्घटना झाल्याच जबाबदारी कोण, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित होत आहे. आदिवासींच्या जमिनीवर बैठ्या चाळी बांधून त्या बिगर आदिवासी लोकांना विकून फसवणूक करणाऱ्या बिल्डरवर कारवाई करण्याची मागणी आदिवासी बांधवांकडून होत आहे. माथेरान डोंगराच्या पायथ्याशी नेरळ शहर वसलेले आहे. येथील पावसाची सरासरी साधारण ४००० मिलीमीटर एवढी असून डोंगरात खोदकाम केल्यास काही मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नेरळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या मोहाचीवाडीत आदिवासी जमिनीवर बैठ्या चाळी बांधण्यासाठी लाल मातीचा डोंगर फोडण्यात आला. उभ्या असलेल्या चाळीतील बिगर आदिवासी लोक वास्तव्य करीत आहेत. नेरळ जवळील मोहाचीवाडीला लागून कविता शिंगवा यांनी आपली ५ एकर जमीन एका बिल्डरला विकसित करण्यासाठी दिली आहे. संबंधित बिल्डरने त्या जागेत असलेली टेकडी महसूल विभागाच्या परवानगीशिवाय फोडून भातशेती सपाट करून घेतली व तेथे चाळी बांधण्यास सुरु वात केली. नेरळ ग्रामपंचायतीने त्यांना घरपट्टी आणि असेसमेन्ट उतारे दिले आहेत. गतवर्षी याच भागात घराची भिंत कोसळून पाच जणांचे बळी गेले होते. असे असताना डोंगर पोखरून बांधलेल्या चाळी किती सुरक्षित आहेत, अशी विचारणा आदिवासी बांधवांकडून नेरळ ग्रामपंचायतीने विचारण्यात येत आहे. डोंगर पोखरून चाळ बांधल्यानंतर दरडीपासून संरक्षणासाठी चार फुटाची संरक्षण भिंत उभारण्यात आली असली तरी हा प्रयत्न तकलादू असून अतिवृष्टीत माळीणसारखी दुर्घटना घडू शकते, अशी भीती येथील नागरिकांना आहे. 12आदिवासी वाड्या नेरळ ग्रामपंचायत हद्दीत आहे. मोहाचीवाडीला लागून असलेल्या कविता शिंगवा यांनी आपली ५ एकर जमीन विकसित करण्यासाठी दिली.बिल्डरने त्या जागेत असलेली टेकडी महसूल विभागाच्या परवानगीशिवाय फोडून भातशेती सपाट करून चाळी बांधण्यास सुरु वात केली. >जमीन केवळ विकसित करण्यासाठी दिली आहे. याठिकाणी चाळी बांधल्या आणि त्यात बिगर आदिवासी लोक राहायला आले. मात्र तरीही जमिनीचा मूळ मालक म्हणून आपणच कायम राहणार आहोत. डोंगराच्या पायथ्याशी चाळी असल्या तरी कोणताही धोका वाटत नाही. - कविता शिंगवा, आदिवासी जमीन मालक>आदिवासींच्या जमिनीवर चाळी बांधल्या असल्या तरी जमीन आदिवासी व्यक्तीच्या नावावर आहे. ग्रामपंचायतीने त्यांना असेसमेंट आणि कराची पावती दिली आहे. परंतु पाणी, रस्ता आणि दिवाबत्ती अशा सुविधा ग्रामपंचायतीने दिल्या नाहीत. - पी. जी. गाडेकर, ग्रामविकास अधिकारी, नेरळ
डोंगर पोखरून आदिवासी वाडीत बांधल्या चाळी
By admin | Published: October 03, 2016 3:13 AM