ऑनलाइन लोकमत -
बुलडाणा, दि. 07- तहान लागलेल्यांना पाणी पाजणे हा सर्वात मोठा धर्म असल्याचे मानले जाते. मात्र पाण्याचा व्यवसाय झालेल्या या काळात पाणी मिळविण्यासाठी संघर्ष होताना दिसून येत आहे. मात्र कोणताही संघर्ष न होता लहान भाऊ समजून पाणी पाजण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती करून बुलडाणा तालुक्यातील देऊळघाट ग्रामस्थांनी दहिद बु. येथे जावून ग्रामस्थांना पाण्यासाठी भिक मागितली. यावेळी दहिद बु.चे उपसरपंच यांना पाणी मिळण्यासाठी निवेदन सादर केले.
यावर्षी अत्यल्प पावसाळ्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. मात्र बुलडाणा तालुक्यातील देऊळघाट येथे मागील अनेक वर्षापासून पाणीटंचाई आहे. तर दरवर्षी उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. अशा परिस्थितीत ग्रामस्थांना तसेच गरिब व्यक्तींना पाणी विकत घ्यावे लागते. तर महिला व मुलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. अशा गंभीर परिस्थितीत मानवतेच्या दृष्टीकोनातून लहानभाऊ म्हणून दहिद ग्रामस्थांनी देऊळघाट गावासाठी मंजूर झालेल्या योजनेसाठी पाणी वापरण्यास कोणताही अडथळा न आणता देऊळघाट ग्रामस्थांना पाणी पाजण्याचे सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली. यावेळी देऊळघाट सरपंच अशिकखान, उपसरपंच बंडूसेठ, ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक सेठ, गजफरखान, मशाऊर रहेमान, तंटामुक्ती अध्यक्ष जनेदखान, माजी सरपंच युनुसखान, बाळू लवंगे, चंदू सपकाळ, सखाराम पाटील, प्रशांत देशमुख, रमेश गोरे, मनु पटेल, नंदू पटेल, अजिस कुरेशी, पंकज बोरसे, इम्रान, जनेदखान, रफिकभाई, वकिलखान, आरीफराज, शफिकभाई, डॉ.फईम आदी ग्रामपंचायत सदस्य व जेष्ठ नागरिकांनी दहिद बु. उपसरपंच विलास राऊत यांना निवेदन दिले.
ग्रामस्थांना दिले आवाहनाचे पत्रक
देऊळघाट ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी दहिद बु. येथील ग्रामस्थांना जाहीर कळकळीच्या आवाहनाचे पत्रक वाटले. त्यात देऊळघाट ग्रामस्थांना पाण्यासाठी कशी भटकंती करावी लागते, कोणत्या समस्या निर्माण झाल्या आहेत. याचे वर्णन करून मोठेभाऊ या नाल्याने देऊळघाट या लहानभावाला पिण्याचे पाणी पाजावे, अशी विनंती केली आहे.