- ऑनलाइन लोकमत
निपाणा येथील विद्यार्थ्यांचा पंचायत समितीमध्ये ठिय्या
खामगाव, (जि.बुलडाणा), दि. 30 - शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटपाचे शासनाचे निर्देश असताना दोन महिन्याचा कालावधी उलटूनही निपाना येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाहीत. यामुळे संतप्त पालकांनी विद्यार्थ्यांसह पंचायत समितीमध्ये ठिय्या मांडून विद्यार्थ्यांचे अर्धनग्न आंदोलन केले.
कॉन्व्हेंट संस्कृतीचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हा परिषदच्या शाळांना उतरती कळा लागली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळामधील विद्यार्थ्यांची संख्या कमालीची घटली आहे. विद्यार्थी संख्या टिकुन राहण्यासाठी सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत मोफत पुस्तके, मोफत गणवेश, शिष्यवृत्ती, मध्यान्ह भोजन आदी विविध योजना शासन राबवित आहे. शिक्षणाच्या बालहक्क कायद्याने तर बालकांना सक्तीचे शिक्षण केले आहे.
विद्यार्थ्यांना विविध सोयी सुविधा जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये मिळत असल्याने ग्रामीण भागात विद्यार्थी संख्या टिकवुन ठेवण्यात मदत होत आहे. जिल्हा परिषदची शाळांची दयनिय स्थिती असतानाही ती सुधारण्यास पुरेसे प्रयत्न होताना दिसत नाही. तालुक्यातील निपाणा येथील जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेत वर्ग १ ते ७ असून १७० विद्यार्थी संख्या आहे. २६ जून रोजी शाळा उघडल्या असून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्याचे शासनाचे निर्देश आहेत. मात्र निपाना येथील शाळेचा कारभार प्रभारी मुख्याध्यापकाकडे आहे. बदली झालेले मुख्याध्यापक सपकाळ यांनी अद्यापही त्यांचा कारभार प्रभारीकडे दिला नाही. तसेच खातेबदलही केला नाही. यामुळे शाळेचे आर्थिक व्यवहार रखडले आहेत. शाळा व्यवस्थापन समितीने बदली झालेल्या मुख्याध्यापकांना खातेबदलाची सुचना देवूनही खातेबदल झाला नाही. यामुळे गणवेश वाटपास विलंब होत असल्याने संतप्त पालकांनी मंगळवारी खामगाव पंचायत समितीच्या शिक्षण विभागात विद्यार्थ्यांसह ठिय्या मांडला. मुख्याध्यापक, शिक्षक पाहिजे, गणवेश मिळालाच पाहिजे, शिष्यवृत्ती मिळालीच पाहिजे, असे फलक विद्यार्थ्यांनी दाखवून अर्धनग्न आंदोलन केले. या आंदोलनामुळे पंचायत समितीमध्ये एकच गर्दी झाली होती.
मुख्याध्यापकासह शिक्षकांची दोन पदे रिक्त
निपाणा येथील शाळेत वर्ग १ ते ७ असून सद्यास्थितीत ६ शिक्षक संख्या आहे. यामधील एका शिक्षकाकडे मुख्याध्यापकाचा प्रभार आहे. शिक्षकांची दोन पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. रिक्त पदे भरण्याची मागणी पालकवर्गाने केली आहे.
शाळेत शिक्षकांची कमतरता आहे. विद्यार्थ्यांना अद्यापही शालेय गणवेश मिळाले नाहीत. शाळेत विविध समस्या असताना शिक्षण विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
- गोविंदा गावंडे, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती निपाणा.