Buldhana Bus Accident : नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसचा मध्यरात्री बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात झाला. या अपघातात बसने पेट घेतला अन् २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. सिंदखेड राजा नजीक बसचे टायर फुटल्याने ही बस रस्त्यावर उलटली. यानंतर काही क्षणातच तिने पेट घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. पण, या अपघातातून बचावलेल्या योगेश रामदास गवईने नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे.
विदर्भ ट्रॅव्हल्सची एमएच २९ बीई-१८१९ क्रमांकाची ही बस नागपूर वरुन पुण्याकडे जात होती. ३० जून रोजी नागपूरहून सायंकाळी ५ वाजता पुण्यासाठी ही बस निघाली होती. १ जुलैच्या रात्री १.२२ मिनिटाने धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली.त्यानंतर काही मिनिटामध्ये पेट घेतल्यानंतर गाडीचा स्फोट होऊन ही खासगी प्रवाशी बस पेटली. त्यानंतर बसमध्ये असणाऱ्या ३३ प्रवाशांपैकी आठ प्रवासी सुखरुप बाहेर पडले. तर २५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुखरुप बाहेर पडलेल्यांमध्ये चालक आणि वाहकाचा समावेश आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना अनुक्रमे 2 व 5 लाखांच मदत जाहीर केली आहे. त्याने सांगितले की,'' औरंगाबादला जाण्यासाठी मी नागपूरहून विदर्भ ट्रॅव्हेल्सची बस पकडली. समृद्धी माहामार्गावर ही बस उलटली अन् लगेचच तिने पेट घेतला. माझ्यासह 3-4 लोकं खिडकीच्या काचा फोडून बाहेर आले. मी एका युवकाला बाहेर खेचले. आम्ही बसवरून उड्या मारल्या आणि क्षणात जोरात ब्लास्ट झाला... त्यानंतर थोड्यावेळात अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या अन् त्यांनी आग विझवली.''