समृद्धी महामार्गावर पहाटे झालेल्या भीषण अपघाताने विदर्भ हादरला आहे. लक्झरी बसमधील २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृतदेह न ओळखता येण्यासारख्या स्थितीमध्ये आहेत. तर आठ जण जखमी झाले आहेत. भाजपाचे नेते आणि माजी मंत्री गिरीष महाजन यांनी जखमींची विचारपूस केली, तसेच अपघात स्थळाची पाहणी केली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अपघातस्थळी रवाना झाले आहेत.
पुण्याला जाणारी ही बस होती. एकूण ३३ प्रवासी होते, त्यातील २५ प्रवाशांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. आम्ही शब्दातून याची तीव्रता सांगू शकत नाहीत. ड्रायव्हर, कंडक्टर यांना साधे खरचटलेलेही नाहीय. एका प्रवाशाला छ. संभाजीनगरला पाठविण्यात आले आहे. तर दोन तीन प्रवासी आहेत त्यांना थोडा धक्का बसला आहे. त्यांची प्रकृती ठीक आहे, असे महाजन म्हणाले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मुंबईहून इकडे यायला निघाले आहेत. पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मृतदेहांची ओळख पटविणे खूप कठीण आहे. फॉरेन्सिक लॅबची टीम येणार आहे. समृद्धी महामार्गावर अपघात होत आहेत. ड्रायव्हरला झोप आल्याने अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे बस पोलवर जाऊन आदळली, असे आम्हाला समजते आहे. परंतू, त्याचे म्हणणे आहे की टायर फुटला आहे. याचा तपास केला जाणार आहे. रस्त्यावर कुठेही टायर फुटल्याचे किंवा घसरल्याचे पट्टे दिसत नाहीएत. यामुळे क्लिअरकट ड्रायव्हरला झोप लागली आणि बस पोलावर आदळ्याचे दिसत आहे., असे महाजन म्हणाले.
वेग देखील अपघाताचे कारण आहे. रस्ता चांगला आहे, परंतू वेगावर नियंत्रण आणायला हवे. यासाठी चालकांचे काऊंसेलिंग करावे लागणार आहे. १८०-२०० च्या वेगाने गाडी चालविणे धोक्याचे आहे. यामुळे अपघात होणारच. हे अपघात कसे रोखले जाईल यावर काम केले जाईल. चालक, क्लिनरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, त्यांची चौकशी केली जाणार आहे, असे भाजपा नेते गिरीष महाजन यांनी सांगितले.
आम्ही 2020 मध्ये बस खरेदी केली. बस चालक दानिश हा अनुभवी होता. टायर फुटल्याने बस रस्ता दुभाजकाला धडकल्याची माहिती मिळाली आहे. बसमध्ये ज्वलनशील वस्तू असल्याने बसने पेट घेतला. - वीरेंद्र दारणा, बसचे मालक