ऑनलाइन लोकमतबुलडाणा, दि. 2 - जिल्हा परिषदेच्या वतीने यशदाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला मानव विकास अहवाल हा शाश्वत विकासाच्या दृष्टीने संशोधनात्मक व सर्वंकष दिशा देणारा भरीव स्वरूपाचा कृतिदर्शक अहवाल असल्याचे सांगून या अहवालानुसार राज्यातील सर्व विभागांना कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्याचे निर्देश मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी दिले.बुलडाणा जिल्हा परिषदेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या जिल्हा मानव विकास अहवालाचे प्रकाशन खारगर येथे ग्रामविकास भवनाच्या उद्घाटनाच्या औचित्यावर मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ग्रामविकासमंत्री ना. पंकजा मुंडे, रायगडचे पालकमंत्री ना. प्रकाश मेहता, ग्राम विभागाचे सचिव असिमकुमार गुप्ता, सिडकोचे महाव्यवस्थापक भूषण गगराणी व अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषदेने स्वपुढाकाराने तयार केलेल्या अहवालाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ यांचे अभिनंदन केले. तसेच हा अहवाल ग्रामीण विकासाच्या दृष्टीने तळागाळातील वस्तुस्थिती लक्षात घेऊन तयार करण्यात आला असून, त्याचे स्वरूप केवळ संशोधनात्मक नाही. या अहवालामधून विविध विभागांच्या माध्यमातून नेमके कोणते काम केले गेले पाहिजे, ही दिशासुद्धा देण्यात आली आहे. सोबतच जिल्ह्यात विविध माध्यमातून विकासासाठी उपलब्ध होणारा निधी कसा विनियोगात आणावा व त्यामधून फलनिष्पत्ती काय राहील, हेसुद्धा निश्चित करण्यात आलेले असल्याचे सांगितले.या अनुषंगाने बोलताना मुख्यमंत्री असेही म्हणाले की, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे प्रत्येक जिल्ह्यात प्रशासनाचा कणा म्हणून कार्यरत असतात. त्यांची जर नावीन्यपूर्ण व कल्पक भूमिका असेल तर जिल्ह्यात येणा-या विकास निधीच्या माध्यमातून पाच वर्षांत संपूर्ण कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. बुलडाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ यांनी ही भूमिका लक्षात घेऊन तयार केलेला हा बुलडाणा जिल्ह्याचा मानव विकास अहवाल निश्चितच महत्वपूर्ण आहे. अशाच प्रकारे सर्व जिल्ह्यांच्या व विभागांच्या वरिष्ठ अधिका-यांनी या आधारेच आपल्या विभागाची वाटचाल निश्चित करावी, असे निर्देशसुद्धा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.ग्रामविकास विभागाच्या वतीने खारगर येथे उभारण्यात आलेल्या ग्रामविकास भवनाच्या उद्घाटन प्रसंगी बुलडाणा जिल्ह्याच्या मानव विकास अहवालाचे प्रकाशन उल्लेखनीय ठरले. यावेळी बुलडाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ, यशदा पुणेच्या मानव विकास केंद्र संचालक डॉ. मीनल नरवणे, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सी. एस. राजपूत, डॉ. अतुल नौबदे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
बुलडाणा जिल्ह्याचा मानव विकास अहवाल दिशादर्शक- फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2017 7:51 PM