हर्षनंदन वाघ
बुलडाणा, दि. २ - ग्रामीण भागासह शहरी भागात मोठ्या प्रमाणात गाजर गवत वाढले आहे. त्यातील परागकण म्हणजे पार्थिनीयममुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. पार्थिनीयमच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना विविध आजारासह खाज सुटणे व असह्य वेदना होत आहेत त्यामुळे वेदनाग्रस्तांनी रूग्णालयात धाव घेतली आहे. या पार्थिनीयमचा धोका त्वचा रोग, मधुमेह झालेल्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणात झाला असून अनेकांचे जीवन धोक्यात आले आहे. शहरासह ग्रामीण भागात पावसाळ्यापुर्वी साफसफाई करणे आवश्यक असते. मात्र अनेक ठिकाणी पालिका प्रशासन किंवा संबंधित ग्रामपंचायत प्रशासन
साफसफाईकडे दुर्लक्ष करताना दिसून येते. यामुळे गाव परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यातच आता ठिकठिकाणी गाजर गवताने डोके वर काढल्यामुळे गाव परिसराला पार्थिनीयमचा (गाजर गवतातील परागकण) धोका
निर्माण झाला आहे. अनेक नागरिक विविध त्वचा रोगाने त्रस्त झाले असून गाजर गवतामुळे निर्माण होणाºया पार्थिनीयमच्या संपर्कात आल्यामुळे अनेकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली आहे.
जिल्ह्यात रस्त्याच्या दुतर्फा बाजूला गाजर गवताने थैमान घातले आहे. जवळपास तीन दशकापूर्वी दुष्काळामुळे भारतात अमेरिकेतून निकृष्ट दर्जाचा गहू मागविण्यात आला होता. या निकृष्ट दर्जाच्या गहू सोबत अनेक प्रकारच्या विषारी गवताचे बियाणे आले होते. त्यातील एक म्हणजे सर्वत्र ओळखले जाणारे गाजर गवत आहे. या गाजर गवताने सर्वच ठिकाणी थैमान घातले असून अनेकांना आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या गाजर गवताच्या पार्थिनीयम या विषारी परागामुळे अनेकांना अॅलर्जी सारखे आजार उद्भवत असून अंग लाल होवून खाज सुटत आहे; असे रुग्ण दररोज वाढत असून उपचारासाठी सामान्य रुग्णालयासह खाजगी हॉस्पीटलकडे धाव घेत आहेत. यासाठी परिसर स्वच्छ व गाजर गवताचे निर्मूलन करणे आवश्यक आहे. यासाठी पालिका प्रशासन व सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
काय असते पार्थिनीयम
गाजर गवतामुळे निर्माण होणारा पार्थिनीयम हा विषारी पराग आरोग्यास हानिकारक असून त्याच्या संपर्कात आलेल्या अनेकांना अॅलर्जी होते. या अॅलर्जीमुळे अंगावर सूज येणे, डोळे लाल होणे, चेहºयावर सूज व मुरुम येणे, अंग लाल होणे, खाज सुटणे आदी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे अॅलर्जीग्रस्त व्यक्तीस भयंकर त्रास सहन करावा लागत असून अनेक
व्यक्तींना अंग कशामुळे लाल होते, याचे कारण कळत नाही.
अंग लाल होणे, खाज सुटणे अशा त्रास होणाºया व्यक्तीसऔषधोपचाराशिवाय पर्याय नसतो. अशा अॅलर्जीग्रस्त व्यक्तीने गाजर गवताच्या संपर्कात येणे टाळले पाहिजे, तसेच पार्थिनीयमचे लक्षणे आढळून आल्यास त्वरित वैद्यकीय
अधिकाºयांशी संपर्क साधावा. - डॉ.पी.पी.पिंपरकर, जनरल फिजिशियन, बुलडाणा.