Samruddhi Mahamarg: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या उदघटनाआधीच विघ्नांची मालिका सुरू झाली आहे. उन्नत वन्यजीव मार्गाच्या कमानीचा भाग कोसळण्याची घटना ताजी असतानाच आता बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या पॅकेज-७ मधील सिंदखेडराजा जवळ आणखी एक दुर्घटना घडली आहे. सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा या गावाजवळ दोन डोंगराळ प्रदेशाला जोडणाऱ्या निर्माणाधीन उड्डाणपुलाचा गर्डर खाली कोसळला. बुधवारी रात्री ही घटना घडली आहे. दुर्घटनेत एक ट्रेलर गर्डर खाली येऊन मोठं नुकसान झालं आहे. सुदैवानं यात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.
जवळपास २०० टन वजनाचा गर्डर तब्बल ८० फूटाहून खाली कोसळला. यातूनच या दुर्घटनेची भीषणता लक्षात येते. निर्माणाधीन पूल जवळपास ५०० मीटर लांबीचा असून ८० फूट उंच आहे. दुर्घटनेवेळी कोणताही कामगार गर्डरखाली नव्हता त्यामुळे मोठी जीवीतहानी टळली. गेल्या तीन दिवसात समृद्धी महामार्गावरील पूल कोसळल्याची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे लोकार्पणाच्या घाईत अशा दुर्घटना होत आहेत का अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.
१६ व्या क्रमांकाचा ओव्हरपास कोसळलाहिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण २ मे रोजी होणार होते. पण या महामार्गावरील सोळाव्या क्रमांकाचा ओव्हरपास आर्च कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. यात एका कामगाराचा मृत्यू झाला होता. तर दोन जण जखमी झाले होते. यामुळे नागपूर ते सेलुबाजार दरम्यान समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा किमान दीड ते दोन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सेलुबाजार ते वर्धा जिल्ह्यापर्यंत समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याची हवाई पाहणीही केली होती.