बुलडाणा : डोळयाची तपासणी करून चष्मा देण्यासाठी चारशे रुपयांची लाच स्विकारणार्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील लाचखोर नेत्र चिकीत्सक अधिकारी पांडुरंग चौथनकर यास लाचलुचपत प्रतिबंधक अधिकार्यांनी २७ फेब्रुवारी रोजी रंगेहाथ अटक केली. बुलडाणा शहरातील इंदिरा नगर येथील रहिवासी समिर खान नजमोद्दिन खान (२४) यास नातेवाईकाच्या डोळयाची तपासणी करावयाची होती. त्यासाठी त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्र चिकीत्सक अधिकारी पांडुरंग नामदेव चौथनकर (४८) यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी चौथनकर यांनी त्यास नातेवाईकाची डोळयाची तपासणी करून चष्मा देण्यासाठी सहाशे रुपयाची मागणी केली. तडजोडीनंतर चारशे रुपये देण्याचे ठरले. चौथनकर यांनी त्याला आजच्या आज पैसे घेवून येण्यास सांगीतले. दरम्यान, समिर खान यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठून याबाबत तक्रार दाखल केली. या तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केल्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सामान्य रुग्णालयात सापळा रचला आणि नेत्र चिकीत्सक अधिकारी पांडुरंग चौथनकर यास रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून लाचेची रक्कमसुध्दा जप्त करण्यात आली.