ठाणे : रविवारी जोरदार बरसलेल्या पावसाने शहरातील अनेक भागांचा वीजपुरवठा बराच वेळ खंडित झाला होता. परंतु, याचा सर्वाधिक फटका हा कळव्याला बसला असून येथील अनेक रहिवाशांच्या घरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी येथील रहिवाशांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या अधिकाऱ्यांना सोमवारी घेराव घातला होता. महावितरणची उच्च दाबाची ओव्हरहेड वायर तुटल्याने कळवा पूर्वेचा भाग पूर्ण अंधारात गेला होता. ठाण्याच्या काही भागांमध्ये काही महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यात रविवारी झालेल्या जोरदार पावसाची भर पडली. रविवारी न्यू शिवाजीनगर, कळवा गावातील भुसारआळी, कुंभारआळी, बुधाजीनगर, कळवा मार्केटमधील वीजपुरवठा सकाळी ७ वाजल्यापासून खंडित झाला होता. दुपारी ३ च्या सुमारास तो सुरळीत होतानाच न्यू शिवाजीनगर येथील महावितरणची ओव्हरहेड वायर तुटली. त्यामुळे उच्च वीजदाबामुळे येथील आठ ते नऊ घरांमधील पंखे, फ्रीज, टीव्ही यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये स्फोट होऊन त्या जळाल्या. यामुळे सोमवारी सेनेने महावितरणच्या कळवा कार्यालयावर मोर्चा काढला. (प्रतिनिधी) >नुकसानभरपाई देणारमहावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून शिवसेनेने येथील समस्यांचा पाढा वाचला. कळवा फिडर वादळी पावसामुळे खराब झाल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याचे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. उच्च दाबामुळे ज्या रहिवाशांच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नुकसान झाले आहे, त्यांची यादी मिळाल्यानंतर पंचनामा करून महावितरणकडे पाठवण्यात येईल तसेच त्यांना जास्तीतजास्त नुकसानभरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन या वेळी महावितरणने दिले.
बत्ती गुलचा कळव्याला सर्वाधिक फटका
By admin | Published: August 03, 2016 3:21 AM