ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 27 - ३५ वषार्पूर्वी कोराडी प्रकल्पातून शेतक-यांच्या शेतांपर्यंत पाणी पोहोचावे, यासाठी बनवण्यात आलेल्या कालव्यात अद्याप पाणी पोहोचलेच नाही. 'लोकमत'ने याबाबत वृत्त प्रकाशित करताच पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी कोरड्या कालव्याची पाहणी केली. तसेच त्वरीत शेतक-यांना पाणी देण्याचे आदेश दिले.
रिसोड तालुक्यातील वाकद भाग १ या क्षेत्रात कोराडी प्रकल्पाव्दारे पाणी मिळण्यासाठी शासन पातळीवर कालवे करण्यात आले आहेत. कालवा झाल्यापासून एकदाही येथे पाणी सोडण्यात आले नाही. यामुळे वाकद येथील सिंचन क्षेत्राखाली येणा-या शेतक-यांना कालव्याच्या पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. याबाबत २३ जानेवारी रोजी 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित केले. याची दखल घेत २७ जानेवारी रोजी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर. सी. होमने, उपविभागीय अधिकारी डी. एस. शेळके, अभियंता एन. ए. बळी यांच्यासह पाटबंधारे विभागाच्या पथकाने पाहणी केली.
यावेळी वरिष्ठ अधिका-यांनी कोरड्या व दुरवस्थेत असलेल्या कॅनालची दुरूस्ती करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्याचे कर्मचा-यांना आदेश दिले. तसेच लवकरच शेतक-यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचेल असे आश्वासन दिले.