मुंबई : बुलेट ट्रेन अन् पुणे-मुंबई हायपर लूप हे निव्वळ दिवास्वप्न असल्याची टीका करीत या प्रकल्पांनी जनतेला काय मिळणार, असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विधानसभेत केला. सीबीआय न्यायालयाचे न्या. लोया यांच्या संशयास्पद्ध मृत्यूची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.नियम २९३ अन्वये उपस्थित चर्चेत सहभागी होताना चव्हाण म्हणाले की, हायपर लूपच्या माध्यमातून ४० हजार कोटींची गुंतवणूक येणार असल्याचा दावा मॅग्नेटिक महाराष्ट्रमध्ये करण्यात आला होता. प्रत्यक्षात हायपर लूप जगात कुठेही नाही. ती आजही संशोधनाच्या अवस्थेत आहे मग ती महाराष्ट्रात सुरू होणार असल्याचे कोणत्या आधारावर सरकार सांगत आहे.मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला १ लाख १० हजार कोटी रुपये लागणार आहेत.महाराष्ट्रात बुलेट ट्रेनचा मार्ग कमी असला तरी महाराष्ट्र आणि गुजरात समसमान गुंतवणूक करणार आहेत. मुंबईतील आर्थिक केंद्र आधीच अहमदाबादला गेले आहे.मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी राहिली नसल्याची टीका चव्हाण यांनी केली.यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी भीमा-कोरेगावची घटना घडविण्यात सरकारलाच रस होता काय, अशी शंका उपस्थित केली. ते म्हणाले की, तेथे लाखो लोक येणार हे माहीत असतानाही तेथे पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवला गेला नाही. मंत्रीही एक दिवस आधीच तेथे जावून आले होते. तिथे काय होणार हे सरकारमधील लोकांना माहिती होते का ? केवळ १८० पोलीस बंदोबस्तात होते.
बुलेट ट्रेन दिवास्वप्नच, जनतेला फायदा नाहीच - पृथ्वीराज चव्हाण यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 6:21 AM