मुंबई : देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाने वेग घेतला आहे. बुलेट ट्रेन प्रकल्प सत्यात उतरवण्याची जबाबदारी आयआयटीयन्सवर देण्याचा विचार नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन (एनएचएसआरसीएल) करीत आहे. सद्य:स्थितीत एनएचएसआरसीएलमध्ये आयआयटी मुंबईचे प्राध्यापक डॉ. अलोक गोयल यांची नियुक्ती करण्यात आली असून भविष्यात बुलेट ट्रेन प्रकल्पातील विविध कामे आयआयटीयन्सवर सोपविण्यात येणार आहेत.बुलेट ट्रेनची देखभाल-दुरुस्ती संपूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारलेली असेल. परिणामी मुंबई-अहमदाबाद बुलेट प्रकल्पात काम करण्यासाठी तंत्रकुशल कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. प्रकल्पाच्या मनुष्यबळासाठी कर्मचाºयांना विशेष प्रशिक्षण देण्यात येईल. यात बुलेट ट्रेनची देखभाल-दुरुस्ती, रुळांची देखभाल, अन्य तंत्रज्ञानाची सखोल माहिती, आपत्कालीन परिस्थिती हाताळणे आणि नियंत्रणाबाबत यांत्रिक माहिती यांचा समावेश आहे. जगभरातून देशातील आयआयटीयन्सला मोठी मागणी आहे.या धर्तीवर बुलेट प्रकल्पातदेखील आयआयटीयन्सच्या बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येईल. मुंबई, दिल्ली, चेन्नई येथील आयआयटीयन्ससह अन्य विद्यार्थ्यांचा देखील यात समावेश करण्याच्या योजनेवर एनएचएसआरसीएल काम करत आहे. ७० किमी प्रतितासपेक्षा जास्त बुलेट ट्रेनचा वेग नियंत्रणकक्षातून हाताळण्यात येणार आहे. तर ट्रेनमधील चालकाला ० ते ७० कि मी प्रतितास या वेगाने बुलेट चालवण्याची परवानगी असणार आहे.परिणामी स्थानक आणि स्थानक परिसर वगळता अन्य मार्गावरील बुलेट ट्रेनच्या वेगावर नियंत्रण कक्षाचे नियंत्रण असेल. ७० किमी प्रतितास वरील वेगासंबंधी सर्व सूचना या नियंत्रण कक्षातून देण्यात येतील.बुलेट ट्रेन प्रकल्पाच्याभू-संपादनाचे काम डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण होईल. यानंतर प्रकल्पाच्या मनुष्यबळाबाबत विचार करण्यात येईल.सध्या मुंबई आयआयटीमधील प्राध्यापक आणि काही आयआयटीयन्सवर प्रकल्पांच्या महत्त्वाच्या कामांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ज्याप्रमाणे बुलेट ट्रेन प्रकल्प आकार घेईल त्यानुसार योग्य तो निर्णय घेण्यात येईल. यासाठी मुंबईसह देशातील अन्य आयआयटीयन्ससह अन्य वर्गातील योग्य उमेदवारांचाही विचार करण्यात येईल, अशी माहिती नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अचल खरे यांनी दिली.320 किमी ताशी प्रतितास या वेगाने धावण्यासाठी बुलेट ट्रेनचा आराखडा तयार आहे. यात हवेचा विरोध करणाºया बाबी अर्थात बोगींबाहेरील हॅन्डल, फुटरेस्ट हे स्वयंचलित असणार आहे.
आयआयटीयन्स साकारणार बुलेट ट्रेनचे स्वप्न!
By महेश चेमटे | Published: March 30, 2018 6:37 AM