- अरुण साधू
अगदी 1947 सालापासूनच्या काही निवडणुकाही माङया अंधूक स्मरणात आहेत. त्या वेळी मी खूप लहान होतो. नेमकी पालिकेची निवडणूक होती की जिल्हा बोर्डाची, हे स्मरणात नाही. परतवाडा नावाचे अमरावती जिल्ह्यातील गाव. दोन-तीन दिवस गावातून जोरजोरात भोंगे फिरत होते. निवडणुकीच्या दिवशी बैलगाडय़ा, घोडय़ांचे टांगे यातून मतदारांना नेण्यासाठी लगबग सुरू होती. आमचे आई-वडीलदेखील एका टांग्यामध्ये कोंबून मतदानासाठी कसेबसे गेले. त्यानंतर मतदारांना टांग्यातून, बैलगाडय़ांतून नेण्याची पद्धत ब:यापैकी गावांमध्ये, खेडय़ापाडय़ांमध्ये असे.
तंत्र भारतातील पहिली निवडणूक अमरावती शहरातील; तो संपूर्ण भाग काँग्रेसचा बालेकिल्ला. तरीदेखील बाकीचे उमेदवार असायचेच. विशेषत: समाजवादी किंवा एखाद-दुसरा कम्युनिस्ट. अगदी क्वचितच पोस्टर बघितल्याचे आठवते. पण बहुतेक प्रचार घरोघर हिंडून, सभांमधून व्हायचा. उमेदवार त्यांच्या ओळखीच्या घरांमधून मतदारांना पाठविण्यासाठी पोस्ट कार्डावर हाताने मजकूर लिहून घेत. त्या कामात आम्ही अगदी लहाने मुलेदेखील सहभागी होत असू. ही कार्डाद्वारे मतदारांना आवाहन करण्याची पद्धत माङया आठवणीप्रमाणो 1962 च्या निवडणुकीर्पयत चालली असावी. असंख्य कार्यकर्ते, त्यांची लहान मुले काहीही मोबदला न घेता अशी कामे करायची. आता पैशांचे प्रमाण, प्रभाव प्रचंड बोकाळल्याने ही फुकट स्वयंसेवा अस्तिवात नाही. आठवणीप्रमाणो बहुतेक 1977, 198क् पासून भलीमोठी पोस्टर्स आणि गुळगुळीत कागदावर छापलेली आवाहने पत्रे पाठविली जाऊ लागली. आता कार्यकत्र्याना मेहनताना हवा असतो.
1957 च्या निवडणुकीच्या वेळी विदर्भ नव्याने द्विभाषिकांत म्हणजे महाराष्ट्रात सामील झाला होता. त्या वेळची निवडणूक अमरावतीसारख्या शहरात मोठय़ा प्रमाणावर गाजली. कारण तिकडे स्वतंत्र विदर्भाचे वारे वाहत होते. संयुक्त महाराष्ट्राचे आचार्य अत्रे, एस. एम. जोशी वगैरे नेते अमरावतीत सभा घेऊन गेले. अत्र्यांच्या सभेमध्ये त्यांनी स्थानिक काँग्रेस नेत्याबद्दल वाह्यात उद्गार काढल्याने सभेत चपला-जोडय़ांची फेकाफेक, ढकलाढकली, थोडय़ाफार प्रमाणात हाणामारीही झाली. हे बहुधा त्या वेळी निवडणुकीच्या धामधुमीत सर्वत्र होत असे. कारण उमेदवारांचा व पक्षांचा प्रचाराचा जोर हा सभा व प्रत्यक्ष भेटण्यावर असायचा. यशवंतराव चव्हाण विदर्भाला अपरिचित होते. अमरावतीत पहिल्या सभेसाठी आले तेव्हा विदर्भवादी लोक सभा उधळण्याच्या हेतून आले असावे. प्रसिद्ध अशा गांधी चौकात त्यांचे भाषण सुरू झाले. विरोधी घोषणा सुरू होत्या. परंतु तीन ते चार मिनिटांत यशवंतरावांच्या वक्तृत्वाने सभा इतकी भारावून गेली, की हळूहळू सर्व लोक शांतपणो ऐकू लागले. माङया आठवणीप्रमाणो निदान आमच्यासारख्या तरुणांचे गट तरी विदर्भाचा नाद सोडून यशवंतरावांमुळे खूपच प्रभावित झालेले दिसे. 1967 व 1972 च्या निवडणुकांमध्ये प्रचाराची पद्धत बदलत गेली. वर्तमानपत्रे प्रचारामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडू लागली. चित्रवाणी नव्हतीच. रेडिओ शासकीय मालकीचा. 1967, 1972 आणि 1977 या निवडणुकांसाठी मी पत्रकार म्हणून बराच हिंडलो. 1971-72 साली तर प्रचंड दुष्काळ होता. तरीदेखील पैसा पाण्यासारखा वाहू लागल्याचे जाणवत होते. 1967 च्या निवडणुकीत जॉर्ज फर्नाडीस, सखा पाटील, कृष्ण मेनन, स. गो. बर्वे यांच्या मुंबईतील लढती जवळून पाहिल्या. तसा तीव्र प्रचार आणि सभा, मिरवणुकीची धमाल नंतर पाहिली नाही. ऐंशीची निवडणूक जबरदस्त होती. कारण कडबोळ्यांचे जनता सरकार पडले होते. इंदिरा गांधी उदयाला येत होत्या. त्या वेळी नागपूरच्या इंदिरा गांधींच्या सभेला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद बघून तसे विस्तृत वृत्त मुंबईच्या वृत्तपत्रत दिले होते. त्यांनी ते प्रथम पृष्ठावर आठ कॉलमी हेडलाइन देऊन छापले. त्या वेळी नागपूरच्या पत्रकारांनी एकामागून एक येत निवडणूक काळात असे वृत्त देऊ नये, असे मोठय़ा जिव्हाळ्याने सल्ले दिल्याचे आठवते. मुंबईतही खूप लोक या वृत्तावर नाराज झाले. पण निदान त्या वेळी तरी माङो भाकीत खरे ठरले. कारण पहिल्याच ओळीत ‘इंदिरा गांधी आल्या आणि त्या जिंकल्या’ अशी वाक्यरचना केली होती. त्याच निवडणुकीवेळी इंदिराबाई सांगलीला सभा घेणार होत्या. सकाळपासून वसंतदादांसोबत सांगलीत हिंडलो आणि त्यांची प्रचाराची पद्धत पाहिली. ‘मत द्या, प्रचाराला आलोय, बाईंची सभा आहे तिकडे या’, असा एकही शब्द दादा उच्चारत नसत. घरोघर जायचे. सगळ्या कुटुंबाची चौकशी करायची. दुपार्पयत मी दमून गेलो होतो. दादा मात्र तरतरीत ताजेतवाने.
इंदिराबाईंची सभा संध्याकाळी होती. त्या लांजाला अडकून पडल्या होत्या. कारण संध्याकाळ झाल्याने हेलिकॉप्टर येऊ शकत नव्हते. इंदिराबाई हट्टी. कारने त्या खडतर रस्त्याने घाटातून येऊन रात्री साडेअकराला सांगलीला पोहोचल्या. थेट सभेत येऊन नारळपाणी पिऊन पंधरा मिनिटे भाषण केले. अर्थातच प्रचंड गर्दी. भाषणानंतर दादा आणि इतर नेते आता रात्री येथेच विश्रंती घ्या, असे अजिजीने सांगत होते. पण बाईंनी ऐकले नाही. पंढरपुरात लोक वाट पाहात आहेत, असे सांगून रात्री बारानंतर त्या पंढरपूरच्या प्रवासाला गाडीने निघाल्या.
घरोघर प्रचाराला जाऊन व्यक्तिगत भेट घेण्याची उमेदवारांना गरज नसते. टीव्ही आणि सोशल नेटवर्कवर आपली छबी झळकत ठेवण्यासाठी लाखो, कोटीमध्ये खर्च करायचे, डबल कटआऊट्स लावायचे; बरोबर दांडग्या, पीळदार तरुणांची फौज बाळगायची.
मोठे शहर असेल तर तेथील मध्यमवर्गीय सोसायटय़ांना रंगरंगोटी करून देण्याची लालूच दाखवायची. एवढय़ावर निवडणूक जिंकता येते. कोणाकडे जास्त पैसा आहे किंवा जवानांची मोठी फौज आहे, त्याचा निकालावर प्रभाव पडू शकतो.
‘मला मत द्या, मत द्या’, असा प्रकार करीत सामान्य लोकांचा अनुनय करण्याची उमेदवारांना गरज नाही. पैसा व ताकद असेल तर ऐंशी टक्के काम होते. जर बडय़ा घराण्यातील किंवा चमकदार वक्तृत्वशैलीचा मोठा नेता असेल तर पुढचे 2क्} काम आपोआप होते.
1952
ची एक आठवण
अगदी पातळ अशा पांढ:या कागदावर तळहाताच्या चौकोनी आकाराची काळ्या-पांढ:या अक्षरांत प्रचारपत्रके छापली जात. पत्रकावर लिहिले होते, ही मस्तवाल बैलजोडी काय कामाची. त्यापेक्षा आपली झोपडीच बरी. प्रचाराच्यावेळी नेहरू हे अकोला किंवा नागपूरला सभा घ्यायचे.
आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून लोक पायी किंवा बैलगाडय़ा किंवा सायकलवरून येत. आमच्या अमरावतीमधून एक पाच पन्नास मुले तरी सायकलवरून अकोल्याच्या प्रचार सभेत नेहरूंना बघायला गेली होती. पुढच्या निवडणुका ब:यापैकी आठवतात.