कल्याण/जळगाव/वाशिम, दि. 21 - बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे बैलपोळा. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. भारतासारख्या शेतीप्रधान देशात, व तेथील शेतकर्यांत या सणाला विशेष महत्त्व आहे. राज्यभरात सर्वत्र उत्साहात बैलपोळा साजरा केला जात आहे.सोशल मीडियामध्ये गुरफटलेल्या तरुणांना भारतीय सणांची ओळख व परंपरा समजावी व ही परंपरा कायम टिकावी यासाठी कल्याणमधील सम्राट अशोक विद्यालय विविध उपक्रम घेत असून यंदाही बैलपोळा सण मोठ्या उत्साहात शाळेत विद्यार्थ्यांनी साजरा केला.
'माझा आवडता सण', असा निबंध शहरी भागातील विद्यार्थ्यांना केवळ काल्पनिकरित्या शाळेत लिहावा लागतो. परंतु बैलपोळा सण व त्याचे महत्त्व याबाबत अनेक विद्यार्थ्यांना माहिती नसते. यामुळे बैलपोळा सणाची माहिती विद्यार्थ्यांना समजावी, यासाठी ही शाळा मागील दोन वर्षांपासून शाळा परिसरात शेतकरी दादाला बोलावून प्रत्यक्ष सण साजरा करण्याची कल्पना शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांना सुचली व त्यांनी ती अमलातही आणली. यंदादेखील त्यांनी तालुक्यातील मुकुंद पावशे व सरिता पावशे या शेतकरी दाम्पत्याला त्यांच्या बैलजोडीसह बोलावून बैलपोळा साजरा केला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष पी टी धनविजय, सुजाता नलावडे हे देखील उपस्थित होते. शाळेच्या पटांगणात बैलांना सजवण्यात आले व बैलांचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगून हा सण उत्साहात साजरा केला.
शेतक-यांनी केली बैलांची सजावट शिरपूर (वाशिम)मध्येही पोळा सणानिमित्त शेतक-यांनी बैलांना सजवलं. त्यांची सजावट करण्यापूर्वी विविध तलावांमध्ये बैलांना आंघोळ घालण्यात आली. दुपारी ३ वाजेपर्यंत पोहाडणे, बैलांची सजावट केली जाते. त्यानंतर बैल पोळ्यात आणले जातात. गावाच्या सीमेजवळ (आखर) एक मोठे आंब्याच्या पानाचे तोरण करून बांधतात. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या या वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात.