- यदु जोशी, मुंबई
आपल्या तीन आजीमाजी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केल्याने आणि अन्यत्रही बंडखोरीचे धक्के बसत असल्याने अस्वस्थ झालेल्या शिवसेनेने आज आॅपरेशन बंडखोरी हातात घेत बंडोबांना बऱ्यापैकी थंडोबा केले. युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या मर्जीतील उमेदवार अमेय घोले यांना प्रभाग १७८ मध्ये शिवसेनेने उमेदवारी दिल्याने स्थानिक शिवसैनिकांच्या संतापाचा उद्रेक झाला होता. मात्र, तेथे कोणी बंडखोरी करणार नाही याची दक्षता आज मातोश्रीवरून घेण्यात आली. विभागप्रमुख आणि इतर काही इच्छुकांशी चर्चा करून समेट घडवून आणला गेला. प्रभाग १९९ मधील विद्यमान नगरसेविका किशोरी पेडणेकर यांना शिवसेनेने पुन्हा संधी दिल्याने तेथेही तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. तथापि, तेथे इच्छुक असलेल्या रुपाली राजेश कुसले यांची समजूत काढण्यात पक्षाला यश आले. खा.अनिल देसाई आणि आ. अनिल परब यांनी विभागप्रमुख, बंडखोर आणि इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर बोलवून हे आॅपरेशन केल्याचे सूत्रांनी सांगितले. आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान यांना प्रभाग १९४ मधून उमेदवारी दिल्याने तेथे महेश सावंत या माजी शाखाप्रमुखाने बंड केले आहे. त्यांना समजविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परळ-भोईवाडामध्ये (प्रभाग २०२) शिवसेनेच्या श्रद्धा जाधव यांच्याविरुद्धची बंडखोरी/ नाराजी शमविण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.राज पुरोहित यांच्या मुलाविरुद्ध बंडखोरीमुंबई भाजपाचे माजी अध्यक्ष आ.राज पुरोहित यांचा मुलगा आकाशविरुद्ध भाजपाचे जनक संघवी यांनी मात्र प्रभाग २२ मध्ये बंडखोरी केली. त्यांनी थेट काँग्रेसकडून उमदेवारी अर्ज भरल्याने पुरोहित यांची डोकेदुखी वाढली आहे. संघवी हे शिवसेनेच्या संपर्कात होते पण शेवटी ते काँग्रेसवासी झाले.महामंडळांचे गाजरबंडखोरी करणारे वा ती करण्याच्या बेतात असलेल्यांना भाजपा आणि शिवसेनेनेही गोंजारले. काहींना स्वीकृत सदस्य करण्याचे आश्वासन देण्यात आले. तर काहींना महामंडळांचे गाजर दाखविण्यात आले. पक्षसंघटनेत स्थान देण्यात येईल, असे काहींना सांगण्यात आले. भाजपाबरोबरच शिवसेनेकडूनही महामंडळांचे गाजर दाखविल्याने महापालिका निवडणुकीनंतरही शिवसेना सत्तेत राहणार अशी चर्चा होती.