लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शीळ-डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोठी देसाई गावामध्ये गावठी दारूभट्टीच्या अड्ड्यावर गुन्हे अन्वेषण शाखेने गुरुवारी धाड टाकून तब्बल ९१ हजार लीटर रसायनासह १४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेचे (घटक क्रमांक १) पोलीस निरीक्षक रणवीर बयेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी येथील अड्ड्यांवर धाड टाकली. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी जंगलाच्या दिशेने पळून गेले. गावठी दारू तयार करण्याचे साहित्य पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केले. प्रत्येकी २०० लीटर क्षमतेचे ६०० प्लास्टिकचे ड्रम, प्रत्येक ड्रममध्ये सुमारे १५० लीटर याप्रमाणे एकूण ९१ हजार ५०० लीटर नवसागर, गूळमिश्रित कच्चे रसायन पोलिसांनी हस्तगत केले. याशिवाय, प्रत्येकी ४० लीटर याप्रमाणे १६०० लीटर तयार गावठी दारूने भरलेले ४० प्लास्टिक कॅन, प्रत्येकी ५०० लीटर क्षमतेचे ६ पायांचे ढोल, अॅल्युमिनिअमचे २ सतेले, २ लाकडी चाटू असा एकूण १४ लाख १४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. पळून गेलेल्या आरोपींबाबत पोलिसांनी माहिती घेतली असता त्यांची नावे मुकुंद केणी, विक्रम केणी, रूपेश केशव म्हात्रे, पंढरी म्हात्रे, नितेश म्हात्रे आणि राकेश बळीराम म्हात्रे अशी असल्याचे समजले.
दारूभट्टीवर धाड; १४ लाखांचा माल जप्त
By admin | Published: June 09, 2017 3:21 AM