- गौरी टेंबकर - कलगुटकर/ ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20 - "पापा, मेरे साथ गलत हुआ है ! असे, परळच्या केईम रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणाऱ्या तेरा वर्षीय मुलाने वडिलांना सांगितले आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मी आणि माझ्या दहा वर्षांच्या मित्रासोबत सुद्धा अशाच अत्याचार झाला आहे. या लाजेमुळे आम्ही दोघांनीही विष प्यायल्याचे या मुलाने सांगितल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा धक्कादायक प्रकार आरे परिसरात घडला असून याप्रकरणी पवई पोलीस चौकशी करत आहेत.
आरेमधील मोरारजी नगरमध्ये आसिफ (नाव बदलले आहे) आणि सुनील (नाव बदलले आहे) ही दोन्ही पिडीत मुले राहत होती. यातील एक मुलगा दहा वर्षांचा तर दुसरा तेरा वर्षांचा आहे. 12 जुलै रोजी या मुलांनी उंदीर मारायचे विष प्राशन केले. ही बाब त्यांच्या पालकांना समजली तेव्हा त्यांनी दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. मात्र, यात आसिफचा मृत्यू झाला. तर, सुनीलला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी तो चार दिवस होता. मात्र, त्याचे लिव्हर निकामी झाल्यामुळे त्याला तातडीने परळच्या केईम रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. दरम्यान, सुनीलला केईम रुग्णालयात दाखल करण्यासाठी स्थानिक समाजसेवक आणि शिवसेना कार्यकर्ते भानूदास सकटे यांनी महत्वाची भूमिका बजावली.
नेमके काय घडले ?
सुनीलच्या वडिलांनी "लोकमत"ला दिलेल्या माहितीनुसार, 12 जुलै रोजी दुपारी साडे चारच्या सुमारास त्याला अचानक उलटी झाली. तेव्हा त्यांनी मुलाची चौकशी केली. तेव्हा मी उंदीर मारायचे विष प्यायलोय असे त्याने वडिलांना सांगितले. त्यानंतर आम्ही त्याला सायन रुग्णालयात हलविले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला केईम रुग्णालयात हलविण्यात आले. इथे त्याचे लिव्हर पूर्णपणे निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, सुनील वेदनेने कण्हत असताना वडिलांना म्हणाला की, तुम्ही मला ओरडलात म्हणुन मी विष प्राशन केले नाही, तर माझ्यावर लैगिंक अत्याचार झालेत. आरेच्या गौतमनगरमध्ये एका खोलीत नेऊन माझ्यासह माझ्या मित्रासोबत हा प्रकार घडल्याचे सुनीलने आपल्या वडिलांना सांगितले.
ट्युशन टिचरला आला संशय !
सुनील गेल्या काही दिवसांपासून भेदरलेल्या अवस्थेत होता. ही बाब त्याच्या ट्युशन टिचरच्या लक्षात आली. तेव्हा त्यांनी आम्हाला बोलावून याबाबत सांगितले. तसेच त्याचा मोठा भाऊ देखील त्याला वारंवार याबद्दल विचारत होता. मात्र त्याने भावलाही काहीच सांगितले नाही आणि अखेर विष प्यायले असे सुनीलच्या वडिलांनी सांगितले.
"मुलाच्या आईचा जबाब नोंदविण्यात आला आहे. मात्र मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आम्हाला मुलाचा जबाब नोंदविता आलेला नाही. त्यामुळे या प्रकरणी आम्ही अधीक चौकशी करत आहोत.
- अविनाश नडवनकीरे
(सहाय्यक पोलीस निरिक्षक, पवई पोलीस स्टेशन)