कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीतील गाफीलपणा आणि विधान परिषद निवडणुकीतील चुरस पाहता यावेळी काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांनी ताकही फुंकून पिल्याचे निदर्शनास आले. तर महादेवराव महाडिक यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे कोणतेही भाव दिसत नव्हते. आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये त्यांनी पत्रकार व पोलिसांशी मतदान केंद्राबाहेर बराच वेळ दिलखुलासपणे गप्पा मारल्या. बोलता-बोलता वारंवार ते इतर मतदान केंद्रांवरील मोबाईलवरून अंदाज घेत होते. कोल्हापुरात उद्योग भवन येथील मतदान केंद्रावर स्वत: महादेवराव महाडिक पांढऱ्या पोशाखात सकाळी ७.४० वाजता आपले सहकारी रंगराव भोसले (हेर्ले) यांच्यासोबत मोटारीतून आले. यावेळी मतदान केंद्रावर शुकशुकाट होता. प्रारंभी सुमारे तासभर महाडिक हे एकटेच काहीवेळ मतदान केंद्राबाहेर थांबले होते. त्यानंतर त्यांनी मतदान केंद्रात जाऊन आतील सीसीटीव्ही कॅमेरे, मतपेटी, आदींची सविस्तर पाहणी केली. पत्रकार व पोलिसांशी मतदान केंद्राबाहेर बराच वेळ दिलखुलासपणे गप्पा मारल्या. त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे कोणतेही भाव दिसत नव्हते; पण बोलता-बोलता वारंवार ते मोबाईलवरून इतर मतदान केंद्रांवरील अंदाज घेत होते. तसेच आपल्या गटाचे मतदार कुठेपर्यंत आले आहेत, याचाही ते अंदाज घेत होते. त्यावेळी त्यांना, ‘इतक्या लवकर का आलात?’ असे छेडले असता एखादा स्थानिक मतदार सकाळी येण्याची शक्यता असते. त्यासाठी त्याचे मतपरिवर्तनही करता येईल, असे त्यांनी सांगितले; पण बोलताना महाडिक यांची नजर इतरत्र भिरभरत होती. सकाळी ९.१० वाजता बसंत-बहार चित्रमंदिराच्या बाजूने आमदार महाडिक समर्थकांनी विजयाच्या घोषणा देत शक्तिप्रदर्शन केले. त्यावेळी भाजप-ताराराणीचे ३१ व एक अपक्ष राजू दिंडोर्ले, असे एकूण ३२ मतदार आरामबसमधून आले. त्यांच्यासोबत सुनील मोदी, सम्राट महाडिक, समीर शेठ, प्रशांत घोरपडे, आदी उपस्थित होते; तर महाडिक समर्थक सत्यजित कदम हे शिरोळ येथील मतदान केंद्रावर असल्याने त्यांनी दुपारी तीन वाजता मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर पुन्हा आमदार महाडिक यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या.विधान परिषद निवडणुकीतील चुरस पाहता सतेज पाटील यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य पक्षाचे मतदार सहलीवर पाठविले होते. देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात सहलीवर गेलेले मतदार शुक्रवारी सायंकाळी पुण्यात दाखल झाले होते. शनिवारी दिवसभर नेत्यांच्या देखरेखीखाली मतदार राहिले. रविवारी सकाळी सहा तर काही मतदार सात वाजता पुण्यातून बाहेर पडले. कऱ्हाड येथे चहा घेतल्यानंतर काही मतदार मलकापूर, पन्हाळा, हातकणंगले व शिरोळकडे रवाना झाले. सतेज पाटील हातकणंगले तालुक्यातील ९३ मतदार घेऊन मतदान केंद्रावर गेले. तिथे माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी खासदार जयवंतराव आवळे यांच्या उपस्थित मतदारांनी मतदान केले. त्यानंतर दुपारी दीड वाजता सतेज पाटील कोल्हापूर महापालिका व करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्यांना घेऊन उद्योग भवन येथे दाखल झाले. या निवडणुकीचा सर्वसामान्य जनतेशी काही संबंध नसला तरी पाटील व महाडिक यांच्यातील लढतीने शहर व दक्षिण मतदारसंघातील प्रत्येक गावातील राजकीय उत्कंठा शिगेला पोहोचली होती. त्यामुळे पाटील समर्थक कार्यकर्ते सकाळी आठ वाजल्यापासूनच उद्योग भवन परिसरात हजर होते. त्यामध्ये मधुकर रामाणे, बाबा पार्टे, अनिल कदम, आदिल फरास, राजू लाटकर, रमेश पुरेकर, हरिदास सोनवणे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते. महादेवराव महाडिक यांचे मतदार सकाळी लवकर केंद्रावर दाखल झाल्याने पाटील समर्थकांची धाकधूक वाढत होती. आपले मतदार कधी येणार, याविषयी कार्यकर्ते एकमेकांकडे विचारणा करत होते. दुपारी दीड वाजता सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ, प्रल्हाद चव्हाण, आर. के. पोवार मतदारांची गाडी घेऊन दाखल झाले आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरू केला. सतेज पाटील यांच्या विजयाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. सतेज पाटील, प्रा. जयंत पाटील मतदारांना घेऊन केंद्रावर दाखल झाले. दारात महाडिक उभे असल्याने दोघांनी मतदारांना सूचना देत सरळ आत नेले. सुरुवातीच्या टप्प्यात बहुतांश नगरसेवकांना मतदान करण्यास सांगितले. त्यानंतर मध्यंतरी जिल्हा परिषद सदस्यांनी मतदान केले. शेवटी शारंगधर देशमुख यांनी मतदान केल्यानंतर सतेज पाटील केंद्राबाहेर पडले. त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी देत जल्लोष केल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. मतदारांना चौकोनी चिठ्ठीसतेज पाटील यांनी मतदारांना दहा दिवसांच्या सहलीमध्ये मतदान कसे करायचे याचे प्रशिक्षण दिले होते; तरीही जोखीम पत्करायची नाही म्हणून केंद्रावर जाताना प्रत्येक मतदाराकडे चौकोनी चिठ्ठी दिली होती. मतपत्रिकेवरील चौकोनात क्रमांक कोणत्या कोपऱ्यात लिहायचा, याविषयीच्या चिठ्ठ्या प्रत्येकाला देऊन कोणी कोणत्या कोपऱ्यात क्रमांक लिहायचा, याच्याही सूचना दिल्या होत्या. ओळखपत्रांची सक्तीसकाळी आरामबसमधून आलेल्या मतदारांना मतदान केंद्रापासून शंभर मीटर अंतरापर्र्यंत लोखंडी अडथळे उभारून पोलिसांनी अडविले. पोलिसांनी या सर्व मतदार नगरसेवकांची ओळखपत्रे पाहून त्यांना आत सोडले. त्यावेळी तेथे आमदार महादेवराव महाडिक आल्याने सर्व नगरसेवकांनी त्यांना वाकून नमस्कार केला.तीन मतदार, ७० पोलीसगगनबावडा तालुक्यात दोन जिल्हा परिषद सदस्य व एक सभापती, असे तीन मतदान होते. या तीन मतांच्या केंद्रावर ७० पोलीस तैनात करण्यात आले होते. मतदान दहा मिनिटांत झाले; पण पोलिसांना दिवसभर ताटकळत बसावे लागले. हातकणंगले, शिरोळ, कागलमध्ये चुरस हातकणंगले : हातकणंगले येथे विधान परिषद निवडणुकीसाठी ९३ पैकी ९३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. महादेवराव महाडिक गटाचे ३९ मतदार सकाळी ९.३० वाजता खासदार धनंजय महाडिक स्वत: घेऊन आले; तर सतेज पाटील गटाचे ५४ मतदार राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, उमेदवार सतेज पाटील, प्रकाश आवाडे, जयवंतराव आवळे याशिवाय दुसऱ्या फळीतील धैर्यशील माने, ऋतुराज पाटील, राहुल आवाडे, राजूबाबा आवळे, अरुण इंगवले हे स्वत: मतदारांना घेऊन हातकणंगले येथे दाखल झाले.इचलकरंजी येथील मतदार बसमधून आले. त्यांच्याबरोबर जिल्हा परिषद सदस्य हजर होते; तर वडगावचे मतदार नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांच्या नेतृत्वाखाली एकत्र मतदानासाठी आले. शिरोळमध्ये तणावशिरोळ : शिरोळ येथील पंचायत समिती सभागृहाच्या मतदान केंद्रावर तणावपूर्ण वातावरणात मतदान झाले़ सकाळी सव्वाआठ वाजता जयसिंगपूरच्या नगरसेविका अनिता कोळेकर व राजश्री जाधव यांनी प्रथम मतदान नोंदविले. महादेवराव महाडिक यांच्यावतीने नाना महाडिक व सत्यजित कदम हे शक्तिप्रदर्शन करीत केंद्रासमोर आले़ यावेळी कुरुंदवाडच्या नगराध्यक्षा मनीषा डांगे यांच्यासह सहा नगरसेवक, तसेच ‘स्वाभिमानी’चे पाच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती यांच्यासह जयसिंगपुरातील आठ नगरसेवकांनी मतदान केले़ काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांचे मतदार घेऊन राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र पाटील-यड्रावकर हजर होते़. दुपारी दीडच्या सुमारास कुरुंदवाडचे एकाचवेळी १२ नगरसेवक मतदान केंद्रावर दाखल झाले़ त्यानंतर जयसिंगपूरचे नगराध्यक्ष सुनील पाटील-मजलेकर यांच्यासह नऊ नगरसेवक मतदानासाठी आले होते़ कागलमध्ये बंडखोरीकागल : कागल तालुक्यातील ४४ मतदारांनी तीन टप्प्यांत येऊन येथील शाहू नगरवाचनालयाच्या इमारतीत मतदान केले. मतदार ४४ असले तरी त्यांच्या दुप्पट पोलीस, शासकीय अधिकारी आणि कर्मचारी, तालुक्यातील दिग्गज नेते, कार्यकर्ते समर्थकांची मोठी गर्दी झाल्याने हा परिसर गजबजून गेला होता.सकाळी साडेदहाच्या आसपास मुरगूडच्या पाटील गटाचे ११ नगरसेवक, संजय घाटगे गटाचा एक नगरसेवक, दोन जिल्हा परिषद सदस्य आणि भाजपचे परशुराम तावरे मतदानासाठी आले. त्यांच्याबरोबर अमरीश घाटगे, प्रवीणसिंह पाटील, आ. महाडिक यांचे पुत्र स्वरूप महाडिक, अतुल जोशी होते. त्यानंतर ११.३० वाजता प्रा. संजय मंडलिक, राजेखान जमादार, सभापती श्रीकांत लोहार, मुश्रीफ गटाचे परेश चौगुले, असे १२ मतदार भैया माने यांच्या घरी आले. या मतदानात दोन जिल्हा परिषद सदस्य, एक सभापती आणि नऊ नगरसेवकांचा समावेश होता. नंतर १२.३०च्या सुमारास १७ मतदारांचा तिसरा टप्पा समरजितसिंह घाटगे, भैया माने, युवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली भैया माने यांच्या घरी आला. यामध्ये कागल नगरपरिषदेचे १७ नगरसेवक होते. सभापतींची बंडखोरी?कागल पंचायत समितीचे सभापती श्रीकांत लोहार हे संजय घाटगे गटाचे आहेत. मात्र, या निवडणुकीत ते सहलीसाठी सतेज पाटील यांच्या यंत्रणेबरोबर राहिले. मतदानासाठीही ते प्रा. संजय मंडलिक यांच्यासमवेत आले.हातकणंगलेत घोषणाबाजीने तणावकाँग्रेसचे मतदार हातकणंगले येथे दाखल होताच महाडिक समर्थक आणि सतेज पाटील समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यावेळी बसमधून उतरणाऱ्या मतदारांना दिसण्यासाठी महाडिक समर्थकांनी खासदार महाडिक यांना उचलून डोक्यावर घेऊन घोषणाबाजी सुरू केली. हातकणंगले येथे दोन्ही गटांचे जवळपास पाचशेवर समर्थक कार्यकर्ते जमा झाले होते. यामुळे सकाळपासूनच येथे तणाव होता. वेळोवेळी पोलीस हस्तक्षेप करत असल्याने अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, दिवसभर तणाव निर्माण झाला होता. व्हीप लागू नाही...भाजपचे विधानसभेचे उमेदवार असलेले परशुराम तावरे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर विजयी झाले होते. पक्षाच्या व्हीपबद्दल विचारले असता ते म्हणाले, काँग्रेस पक्षाने मला काढून टाकल्याने व्हीप लागू होत नाही. नगरसेवक संजय कदम यांच्याबाबतही असाच प्रकार आहे.
बंटींची दक्षता; आप्पा बिनधास्तच!
By admin | Published: December 28, 2015 1:02 AM