मुंबई : भ्रष्टाचाराचा आरोप असलेले महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) उपाध्यक्ष तथा एमडी संचालक राधेश्याम मोपलवार यांना पदावरून दूर करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केली. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना या पदापासून दूर करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.गुरुवारी विधिमंडळाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्टÑवादीचे नेते अजित पवार व जयंत पाटील यांनी विधानसभेत, तर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह अनेक सदस्यांनी विधान परिषदेत मोपलवार यांच्या निलंबनाची जोरदार मागणी केली. निलंबन होत नाही, तोपर्यंत कामकाज चालू देणार नसल्याचा इशाराही दिला. पंतप्रधान कार्यालय, प्राप्तीकर विभागाकडे मोपलवार यांच्या बेहिशेबी संपत्तीबद्दल तक्रार करूनही त्याची दखल घेतली गेली नाही, याकडे विरोधकांनी लक्ष वेधले. पत्रव्यवहारही सभागृहात सादर केला. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे आरोप त्यांच्याच गळ्यात टाकले. ते म्हणाले, विरोधकांनी मोपलवार यांच्यावर लावलेले आरोप हे त्यांच्याच कार्यकाळातील आहेत. समृध्दी महामार्गाच्या कामाबद्दल त्यांच्यावर आरोप नाही.सगळ्या पोस्टिंग आघाडीच्या काळातल्या-मोपलवार यांना याआधी ज्या ज्या पोस्टिंग दिल्या गेल्या त्या सगळ्या आघाडी सरकारच्या काळातच दिल्या होत्या, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला. मात्र विरोधकांनी मोपलवार यांच्याबद्दल सादर केलेल्या पत्रव्यवहारावर त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही.
‘समृद्धी’चा भार आता दुस-याच्या खांद्यावर, चौकशी होईपर्यंत मोपलवार पदावरून दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 4:19 AM