मुंबई : सरकारतर्फे सागरी किनाऱ्यावर बंदरे विकसित करण्यात येत असतानाच मानखुर्द येथे नव्याने उभारण्यात येणारे योगायतन बंदर हे मुंबई पोर्ट ट्रस्ट, जेएनपीटीवरील भार हलका करेल, असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.योगायतन ग्रुपतर्फे मानखुर्द येथे उभारण्यात येणाऱ्या योगायतन बंदराच्या कोनशिलेचे अनावरण शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि योगायतन ग्रुपचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र सिंग उपस्थित होते.देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्याच्या आर्थिक विकासाला योगायतन बंदर हातभार लावेल. राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वेशी या बंदराची नाळ जोडली जाईल. दिघी-रोहा बंदराला या बंदराशी रेल्वेद्वारे जोडले जाईल; शिवाय उर्वरित बंदरांवरील आयात-निर्यातीचा भारही हलका होईल.डॉ. राजेंद्र सिंग या वेळी म्हणाले, देशाच्या पश्चिम क्षेत्रातील बंदरांचा भार हलका करण्यासाठी योगायतन बंदर साहाय्यकारी ठरेल. उद्योगधद्यांच्या विकासासाठी याचा हातभार लागणार असून, राज्याच्या आर्थिक वृद्धीसही याचा लाभ होईल. मानखुर्द येथे योगायतन बंदर विकसित होणार आहे. ठाणे खाडी रेल्वे पुलापासून हे बंदर जवळ आहे; तर जेएनपीटीपासून या बंदराचे अंतर १० सागरी मैल एवढे आहे. (प्रतिनिधी)
उर्वरित बंदरांवरील भार कमी होईल - मुख्यमंत्री
By admin | Published: December 05, 2015 9:07 AM