राहुल वाडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड : येथील रुग्णालयातील एकमेव डॉक्टर आजारी पडल्यामुळे सध्या या संपूर्ण रुग्णालयाचा भार आता शिकाऊ (इंटर्नी) डॉक्टरांवर येऊन पडला आहे. त्यामुळे गर्भवती, प्रसूतिच्या उंबरठ्यावर असलेल्या माता तसेच विंचू आणि सर्पदंशाचे व साथीच्या आजारांचे रुग्ण यांना खासगी रुग्णालयातून महागडे उपचार घ्यावे लागत आहेत. किंवा लांबच्या शासकीय रुग्णालयांत उपचारासाठी धाव घ्यावी लागते आहे.तालुक्यातील ग्रामीणभागात वातारणातील बदलानुसार आजार बळावत असून विक्रमगड ग्रामीण रुग्णालयावर दैनंदिन ३०० ते ३५० बाह्य रुग्णांचा वाढता भार पडतो आहे. त्यामध्ये मलेरिया, टायफाईड, सर्पदंश व गरोदर महिला या रुग्णांचा समावेश जास्त असून त्यांच्यावर सध्या आवश्यकते उपचार होत नाहीत. कारण या रुग्णालयास एकच डॉक्टर होते. आता ते ही आजारी पडल्याने तीन आठवडयापासून येथील रुग्णालयाचा कार्यभार हा शिकाऊ डॉक्टरांवर (इंटर्नी) पडला आहे. या डॉक्टरांकडे अनुभव नाही ते फक्त प्राथमिक उपचारा व्यतिरिक्त काहीही करु शकत नाहीत. त्यामुळे गंभीर रुग्णांना येथे उपाचार मिळत नसल्याने जव्हार, डहाणू, ठाणे, पालघर वा अन्य ठिकाणी पाठविले जाते व यामध्ये रुग्णाची मोठयाप्रमाणवर हेळसांड होते आहे़. त्यामुळे एखादा रुग्ण दगावल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जातो आहे़येथे कर्मचारीही अपुरे असल्याने आहे त्या कर्मचाऱ्यांस तारेवरची कसरत करावी लागते आहे़ या रुग्णालयात अधीक्षकासह, वैद्यकीय अधिकारी व इतर वर्गाची पदे रिक्त आहेत. त्यात एकमेव वैद्यकीय अधिकारी डॉ़ सुनील भडांगे हे गेल्या तीन आठवड्यापासून आजारी असल्याने रजेवर आहेत.़ त्यामुळे इंटर्नींना अनुभव नसतांनाही त्यांच्यावर संपूर्ण रुग्णालयाचा भार टाकण्यात आला आहे. गंभीर रुग्णांना योग्य ते उपचार मिळत नसल्याने त्यांना रेफर केले गेले तरी अनेकदा शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध नसते. त्यामुळे हजारो रुपये मोजून खासगी रुग्णवाहिका घ्यावी लागते. ऐवढे करुन ज्या रुग्णालयात नेले जाते तिथे दाखल करुन घेतले जाईलच याची शाश्वती नसते. अनेकदा ते रुग्णालय आणखी दुसऱ्या रुग्णालयाकडे त्या रुग्णाला रेफर करते. म्हणजे पुन्हा रुग्णवाहिकेचा भुर्दंड वाढतो, अशी अवस्था आहे. विशेष म्हणजे आदिवासी विकासमंत्री व पालकमंत्री विष्णू सवरा यांचा हा मतदारसंघ असून तेथील रुग्णालयाची अशी दुरावस्था आहे. मात्र याकडे लक्ष देण्यासाठी येथील त्यांना वेळ नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे.़ तसेच या रुग्णालयात शासनाने आॅपरेशनसाठी लागणारी यंत्रसामुग्री दिलेली आहे़ परंतु तिचा वापर करण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ मात्र दिलेले नाही. त्यामुळे या सामुग्रीचा कोणताही फायदा रुग्णांना होत नाही़ या रुग्णालयाची इमारत जरी चांगली असली तरी येथे अद्यापही पूर्वीप्रमाणेच प्राथमिकच उपाचार केले जातात. हा जंगलग्रस्त परिसर असल्याने साथीचे आजार बळवतात. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टार व मंजूर असलेली कर्मचाऱ्यांची सर्व पदे भरलेली असणे आवश्यक आहे. तालुक्यातील ९४ गावपाडे व दीड लाख लोकसंख्येकरिता हेच मोठे एकमेव रुग्णालय आहे़खेड्यापाड्यातील व शहरातील घाणीचे साम्राज्य, खडडयातील गढूळ पाणी, उघडयावरील दूषित पदार्थ खाल्याने आजार बळावत आहे.़>अशी आहे दुर्दशासध्या खरिपाचा हंगाम सुरु असल्याने संर्प व विंचूदंशाचे रुग्ण मोठ्या संख्येने दाखल होत आहेत, तर घाणीचे साम्राज्य जागोजागी तयार होणारी डबकी, अस्वच्छता, तुंबलेली गटारे, सांडपाणी त्यापासून होणारी डासांची मोठी उत्पत्ती यामुळे मलेरिया, टायफाईडदेखील बळवत आहेत. त्यात कुपोषणाची भर पडलेली आहे. त्याच्यावर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरच नसल्याने अशा रुग्णांना नाहक आर्थिक भुर्दंड व त्रास सहन करावा लागतो आहे़
शिकाऊ डॉक्टरांवर तालुक्याचा भार
By admin | Published: July 14, 2017 3:33 AM