पुणे : वाळवंटाप्रमाणे दिवसा कमालीचा उष्मा आणि रात्री गारवा अशीच स्थिती अहमदनगर आणि पुण्यामध्ये आहे. कोकण किनारपट्टीतील जिल्ह्यांमधील कमाल व किमान तापमानात वाढ झाल्याने रत्नागिरी, डहाणू, भिरा, कुलाबा येथील उष्म्यात कमालीची वाढ झाली आहे.अहमदनगर येथे सर्वात नीचांकी १०.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मात्र येथील कमाल तापमानाचा पारा ३६ अंश सेल्सिअस होता. त्यामुळे दिवसा उष्मा तर रात्री गारठा असे विचित्र चित्र येथे आहे. पुण्यातही किमान तापमानाचा पारा १२.१, तर कमाल तापमान ३२.६ अंश सेल्सिअसवर आहे. लोहगाव येथील कमाल तापमान ३४.३ व किमान तापमान १५.४ आणि पाषाणचे कमाल तापमान ३४.१ व किमान तापमान १४.४ अंश सेल्सिअस होते. सातारा येथील कमाल तापमान ३३.६ व किमान १३.४ अंशावर होते. कोकण किनारपट्टीच्या परिसरातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. रत्नागिरीचे कमाल तापमान ३५.४ आणि किमान तापमान १८ अंश सेल्सिअस होते. अलिबाग कमाल तापमान ३० व किमान तापमान २०.४, तर कुलाबा येथील कमाल तापमान ३०.५ व किमान तापमान २३.५ अंश सेल्सिअसवर गेले आहे. भिरा येथील कमाल तापमान राज्यात सर्वाधिक ३८.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. (प्रतिनिधी)पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरचे कमाल तापमान ३४.९ व किमान तापमान १७.७ अंश सेल्सिअसवर आहे. सांगली कमाल ३५.४ व किमान १८.१, सोलापूरचे कमाल तापमान ३६.३ व किमान तापमान १९.४ अंश सेल्सिअस नोंदविले.
पुण्यासह राज्यात दिवसा उकाडा, रात्री गारवा!
By admin | Published: March 11, 2017 3:31 AM