जेनेरिक औषध खाक : जनतेच्या आर्थिक बळाची गरजनागपूर : अन्न-वस्त्र-निवारानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आरोग्याचा. या वाढत्या महागाईच्या काळात अनेक नागरिक परवडत नाहीत म्हणून औषधे न घेताच रोग आणि आजार सहन करतात. यामुळे अनेकांचा अकाली मृत्यू होतो. अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मदत व्हावी म्हणून जनमंचने नागपुरात पहिले जेनेरिक्स औषधे उपलब्ध करून महत्त्वाची सेवा सुरू केली. जेनेरिक्स औषधे गरिबांसाठी जणू प्राण वाचविणारी ‘संजीवनी’च ठरली. मात्र सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान गरिबांची ही ‘संजीवनी’ जळून खाक झाली़ तब्बल साडेसात लाखांचे नुकसान झाले. जनमंचला आता आर्थिक बळाची गरज आहे. हे बळ लाभले तरच गरिबांना पुन्हा ही औषधे पुरविणे शक्य होणार आहे़महागड्या औषधांमुळे रुग्णाचा जीव मेटाकुटीला येतो. यातून मार्ग काढण्यासाठी जनमंचने मार्च २०१३ मध्ये पुढाकार घेत धरमपेठमधील झेंडा चौकात जेनेरिक्स औषध दुकान सुरू केले. जनमंचचा नागपुरातील या पहिल्याच प्रयोगाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जेनेरिक औषधे स्वस्त असतातच पण ती गुणवत्तेत आणि परिणामकारकतेत जराही कमी नसतात. यामुळे ग्राहकांची गर्दी वाढू लागली. या सेवेतून खऱ्या अर्थाने गरिबांची-मध्यमवर्गांची सेवा घडू लागली. परंतु दुकानाला लागलेल्या आगीमुळे या सेवेत खंड पडला. आज दोनशेच्यावर रुग्णांना रिकाम्या हाताने परतावे लागले. यातील अनेकांनी हे संकट जनमंचसोबतच आमच्यावरही कोसळल्याची भावनाही बोलून दाखविली. या विषयी अधिक माहिती देताना जनमंचचे प्रभाकर खोंडे आणि प्रल्हाद करसने यांनी सांगितले, सोमवारी रात्री ९.३० वाजता दुकान बंद केले. त्याच रात्री १० वाजताच्या सुमारास दुकानासमोरील विद्युत खांबावर विद्युत जोडणीचे काम सुरू होते. अचानक विद्युत दाब वाढला. बहुतेक यामुळेच दुकानात शॉर्टसर्किट झाले असावे. रात्री ११.३० वाजताच्या सुमारास दुकानाच्या व्हेंटिलेटरमधून धूर बाहेर येत असल्याचे शेजाऱ्यांना दिसले. त्यांनी लागलीच अग्निशमन दलाला आणि जनमंचच्या सदस्यांना याची माहिती दिली. परंतु मदत पोहचेपर्यंत औषधांसह संगणक, पंखे, फर्निचर व इतर साहित्य जळून खाक झाले.आता एवढी मोठी रक्कम पुन्हा उभे करणे हे आमच्यासमोर आव्हान आहे. मात्र यात जनतेने आर्थिक मदत केल्यास गरजू रुग्णांसाठी असलेली ही सेवा लवकरच सुरू होईल, असेही ते म्हणाले.(प्रतिनिधी)
गरिबांच्या ‘संजीवनी’ला आगीचा विळखा
By admin | Published: October 22, 2014 12:58 AM