पंधरा ते वीस एसटी बसेस जळून खाक नाशिक : तळेगाव-अंजनेरी (ता. त्र्यंबक) येथील बालिकेवर एका युवकाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस येताच, या घटनेचे नाशिक परिसरात तीव्र पडसाद उमटले. जमावाने पोलिसांवर दगडफेक करत एस.टी. बसेस व इतर वाहने पेटवून दिली. त्यामुळे नाशिकहून जाणाºया महामार्गांवरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. दगडफेकीत ३५ पोलीस जखमी झाले. रात्री उशिरापर्यंत अनेक ठिकाणी जाळपोळीचे सत्र सुरूच होते. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. शनिवारी सायंकाळी त्र्यंबक तालुक्यातील तळेगाव अंजनेरी येथील पाच वर्षीय बालिकेवर गावातीलच एका किशोरवयीन मुलाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ही बाब स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच, त्यांनी मुलाला पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले. तर अल्पवयीन मुलीला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या घटनेचे वृत्त सोशल मीडियातून (पान २ वर) वाºयासारखे पसरताच, ठिकठिकाणी रात्रीपासूनच रास्ता रोको आंदोलन सुरू झाले. त्यामुळे राज्य व राष्टÑीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. रविवारी दुसºया दिवशीही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. नाशिक-त्र्यंबकरोडवरील तळेगाव-अंंजनेरी फाट्यावर शेकडो लोकांनी ठिय्या मांडला. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन अत्याचारित बालिकेच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच, तिच्या कुटुंबीयांचीही भेट घेऊन घटनेची माहिती घेतली. त्यानंतर तळेगाव येथील घटनास्थळी भेट देऊन आंदोलकांना शांततेचे आवाहन केले. ‘झाला प्रकार दुर्दैवी असून, मी स्वत: पीडित मुलीची भेट घेऊन आलो, तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला आहे, बलात्कार झालेला नाही’ असे महाजन यांनी सांगितले. मात्र, पालकमंत्र्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. काहींनी पालकमंत्र्यांना धक्काबुक्की करण्याचाही प्रयत्न केला. दरम्यान, त्र्यंबकेश्वर येथे धार्मिक कार्यक्रमानिमित्त जात असताना माजी मंत्री एकनाथ खडसे यांनीही आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. स्थानिक नागरिकांनी त्यांच्याकडे झाल्या घटनेची माहिती देत पोलिसांविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. खडसे यांनी आंदोलकांच्या भावनांशी सहमती दर्शवित, सरकार त्याची दखल घेईल, असे आश्वासन दिले व त्यानंतर ते त्र्यंबकेश्वरकडे रवाना झाले. (प्रतिनिधी)
या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळाला भेट देऊन विचारपूस केली आहे. आरोपींना लवकरात लवकर शिक्षा मिळावी, यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविला जाईल. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. - देवेंद्र फडणवीस,
मुख्यमंत्री त्र्यंबकेश्वरमधील घटनेला जबाबदार असलेल्या घटकाला पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. लवकरात लवकर चार्जशिट भरून आरोपीला कठोर शिक्षा करू, अशी भूमिका सरकारने घेतली आहे. शेवटी सरकारकडून याच अपेक्षा असतात, त्या आता पूर्ण झाल्या आहेत. मी लोकांचा संताप समजू शकतो. मात्र, आता कारवाई झाल्यानंतर संतापाला पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे. - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस