लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मद्यपी तरुणाने नशेमध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यात आलेल्या तब्बल २७ दुचाकी, तीन चाकी आणि सायकली पेट्रोल ओतून पेटवून दिल्या. ही घटना मध्यरात्री दीडच्या सुमारास जनता वसाहतीमध्ये घडली. दत्तवाडी पोलिसांनी या तरुणाला काही तासांतच गजाआड केले. नीलेश ऊर्फ झब्या हरी पाटील (वय २५, रा. गल्ली क्रमांक ३८, जनता वसाहत) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. जनता वसाहत झोपडपट्टीमध्ये वाहने लावायला जागा नसल्याने मोकळ्या जागांमध्ये तसेच रस्त्याच्या कडेला नागरिक त्यांची वाहने लावतात. वसाहतीमधील गल्ली क्रमांक ३७ मधील सार्वजनिक शौचायलासमोर मोठ्या प्रमाणावर वाहने लावण्यात आलेली होती. मध्यरात्री दीडच्या सुमारास झब्याने पेट्रोल ओतून वाहने पेटवून देत पळ काढला. काही क्षणातच सर्व वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. धुराचे लोट उठू लागल्यावर स्थानिक नागरिकांना जाग आली. त्यांनी तातडीने पोलिसांसह अग्निशामक दलाला माहिती कळविली. दत्तवाडी पोलिसांसह अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी तातडीने दाखल झाले. दरम्यान, स्थानिकांनी पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला होता. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविले. >झोपेतच आवळल्या आरोपीच्या मुसक्या या घटनेत एकूण २७ दुचाकी, २ सायकल आणि १ टेम्पो जळून खाक झाला आहे. १८ वाहने पूर्ण जळाल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे नागरिक संतप्त झाले होते. दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कृष्णा इंदलकर यांनी तातडीने आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. वाहनांच्या आसपास एक मद्यपी तरुण संशयास्पद अवस्थेत फिरत होता, अशी माहिती मिळताच पोलिसांनी त्याचा शोध घेतला. त्याच्या घरी जाऊन पोलिसांनी झोपेतच त्याच्या मुसक्या आवळल्या. आरोपी झब्या सिंहगड रस्त्यावरच्या एका दुचाकी शोरूममध्ये वाहनांना पॉलिश करण्याचे काम करतो. घटनास्थळावरील एका दुचाकीतील पेट्रोल काढून त्याच्या आधारे आग लावल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. ही कारवाई परिमंडल दोनचे उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे, सहायक आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
जनता वसाहतीत जळीतकांड
By admin | Published: July 10, 2017 1:41 AM