दापोली : आंबेनळी घाटातील दरीत २८ जुलै रोजी कोसळलेली बस शनिवारी महाबळेश्वर ट्रेकर्सच्या माध्यमातून तब्बल ७ तासाच्या अथक प्रयत्नानंतर हायड्रा क्रेनच्या सहाय्याने काढण्यात आली आहे.
बसला अपघात झाला, त्यावेळी ती कोण चालवत होता, याचा उलगडा करण्यासाठी ही बस बाहेर काढण्यात आली असून बस बाहेर काढण्यात आल्यामुळे आता पुढील तपासाला गती मिळणार आहे. ही बस आता कोकण कृषी विद्यापीठाचे गॅरेजमध्ये दापोली येथे ठेवण्यात येणार आहे.आंबेनळी घाटातील बस दरीतून काढण्यात आल्यानंतर परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या पाहणीतून अपघात कशामुळे झाला? या तपासातून पुढे येणार आहे. परंतु ही बस कोण चालवत होता? ३० जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी मात्र या
अपघातातून वाचलेले प्रकाश सावंतदेसाईच अपघातप्रसंगी बस चालवत असावेत, असा संशय व्यक्त केला आहे. बसच्या स्टेअरिंगवरील बोटाचे ठसे घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून त्यावरून अपघातप्रसंगी बस कोण चालवत होते, हे पुढे येणार आहे.महाबळेश्वर ट्रेकर्सचे सुनील बाबा यांनी दरीतून बस बाहेर काढण्याच्या कामात पोलीस आणि हायड्रा क्रेन यंत्रणेला सहकार्य केले. दोन्ही ट्रेकर्स आणि एल अँड टी कंपनीचे हायड्रा क्रेन आॅपरेटर यांच्यातील सामंजस्य कमालीचे दिसून आल्यानेच या अपघातग्रस्त बसचा सांगाडा दरीमध्ये दोनवेळा थांबवून तिसºयावेळी बॅरिकेट्सजवळ उभा करण्यात आला.हायड्रा क्रेन आॅपरेटरने दरीच्या बाजूला हा सांगाडा अलगद रस्त्यावर ठेवला आणि सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरू झालेले बसला बाहेर काढण्याचे आॅपरेशन दुपारी पावणेदोन वाजता संपले.पोलादपूर पोलीस ठाण्याचे २५ तर वाहतूक विभागाचे ३० कर्मचारी अपघातस्थळी उपस्थित होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी संपूर्ण रेस्क्यू आॅपरेशनचे संचलन केले.
यावेळी अपघाताचे कारण शोधण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अन्य गुन्हे विषयक पुरावे शोधण्यासाठी फॉरेन्सिक लॅबचे तज्ज्ञ तसेच पोलादपूर तहसीलदार शिवाजी जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता पोपट लवटे तसेच स्थानिक पोलीस पाटील विमल मोरे हेदेखील घटनास्थळी उपस्थित होते.मृतांचे नातेवाईकही उपस्थित..बस दरीमधून काढण्याच्या ठिकाणी डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली येथील मृतांचे नातेवाईकदेखील उपस्थित होते. दरीतील बस आणि परिसरामध्ये मयत व्यक्तींचे ४ मोबाईल आढळून आल्याने अन्य काही मोबाईल मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.चौकटदोनवेळा वायर तुटलीहायड्रा क्रेनची दोन वेळा वायर तुटल्यानंतर अपघातग्रस्त बस दरीतून बाहेर काढताना दोनवेळा दरीमध्ये थांबवण्यात आली होती. सह्याद्र्री ट्रेकर्स आणि महाबळेश्वर ट्रॅकर्सच्या तीस तरुणांनी दरीत खोल उतरून टाटा स्टारबस या अपघातग्रस्त वाहनाला वायररोपने घट्ट बांधले.