पाथरी (जि.परभणी) : पाथरी- उमरा बस उमरा येथून परत येत असताना गुंज गावाजवळ बसचा स्टेरिंग रॉड तुटल्याने रस्त्याच्या बाजुला दहा फूट खोल खड्ड्यात उलटून अपघात घडला. या अपघातात २० प्रवासी जखमी असून १२ जणांवर पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. ही घटना ८ जून रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारस घडली. रस्त्यावर खड्डे असल्यामुळे ते चुकवितांना हा अपघात घडला.पाथरी आगाराची बस (क्रमांक एम.एच.०६- एक्स ८७९२) सकाळी ७.३० वाजता पाथरीहून उमरा गावाकडे निघाली होती. पाथरी, बाभळगाव, लोणी, गुंज, अंधापुरी, उमरा या मार्गावरुन ही बस उमरा येथून प्रवासी घेऊन परत निघाली. अंधापुरी ते गुंज या रस्त्यावर गुंज जवळील जायकवाडी कॅम्पच्या बाजुला या बसला सकाळी ८.३० वाजता पाथरीकडे परत येत असताना अपघात झाला. गुंज ते अंधापुरी हा रस्ता अत्यंत खराब झाल्याने या रस्त्यावरील खड्डे चुकविताना बसचा अचानक स्टेरिंग रॉड तुटल्याने बस चालकाच्या बाजुने रस्त्याच्या बाजुला १० फुट खोल खड्ड्यामध्ये कोसळली. १२ प्रवाशांना गजानन रामकिशन वाघमारे यांनी आपल्या जीपमधून पाथरी येथे उपचारासाठी आणले. येथील ग्रामीण रुग्णालयात जखमी प्रवाशांवर उपचार करण्यात आले. एवढा मोठा अपघात घडल्यानंतरही प्रवाशांना किरकोळ इजा झाल्या. (वार्ताहर)
खड्डे चुकविताना बस कोसळली खड्ड्यात
By admin | Published: June 09, 2014 3:22 AM