रेश्मा शिवडेकरमुंबई : सकाळच्या वाहतूक कोंडीत शाळांच्या बसगाड्या चालविणे अवघड असल्याचे सांगत स्कूल बस चालकांकडून पाचवीपर्यंतचे वर्ग नऊनंतर भरविण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून सक्तीचे धोरण अवलंबल्यास आंदोलनाचा इशारा बसचालक संघटनेने दिला आहे.
मुंबईत अनुदानित, खासगी शाळांमधील सुमारे ८० टक्के विद्यार्थी शाळेत ये-जा करण्यासाठी खासगी बस किंवा व्हॅन, रिक्षांचा वापर करतात. सकाळच्या वेळेत होणाऱ्या वाहतूक कोंडीत लहान मुलांचे हाल होणार आहेत, याकडे बसचालकांनी लक्ष वेधले आहे. शाळांच्या वेळांबाबतची सक्ती केल्यास बसचालकांचा आर्थिक भुर्दंड वाढणार आहे. सरतेशेवटी तो पालकांनाच सोसावा लागेल. पाचवीपर्यंतचे वर्ग नऊनंतर भरविण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा. अन्यथा आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल, असा इशारा ‘स्कूल बस ओनर्स असोसिएशन’चे (एसबीओए) अनिल गर्ग यांनी दिला.
आर्थिक भुर्दंड कसा?बसगाड्यांची संख्या वाढविली तरच बसचालकांना फेऱ्या वाढविणे शक्य होईल. बसगाड्या वाढल्या तर ती चालविण्याकरिता लागणारे मनुष्यबळ (उदा. चालक, मदतनीस, महिला सहकारी) देखील वाढवावे लागले. शिवाय इंधन खर्च वाढेल तो वेगळा. त्यामुळे फेऱ्यांची संख्या वाढविणे बसचालकांकरिता आर्थिक भुर्दंडाचे ठरणार आहे. बसचालक शेवटी हा खर्च पालकांच्या माथी मारणार. त्यामुळे वाहतूक सेवेवरील खर्चात वाढ होणार आहे.
बसचालकांचा विरोध का? मुंबई, पुणे, ठाणे यांसारख्या शहरात कार्यालयात जाणाऱ्यांच्या गर्दीमुळे सकाळी आठनंतर वाहतूक कोंडी प्रचंड वाढते. त्याआधीच शाळेच्या बसगाड्या पहिल्या सत्रातील मुलांना शाळेत पोहोचवितात. त्यामुळे त्यांना कोंडीचा सामना करावा लागत नाही. दुपारी बसगाड्या दुपारच्या सत्रातील मुलांना शाळेत घेऊन येतात. त्यावेळी वाहतूक कोंडी तुलनेने कमी झालेली असते. याच गाड्यांतून पहिल्या सत्रातील मुलांना शाळेतून घरी सोडले जाते. त्यामुळे बसगाड्यांच्या खेपा वाचतात. पर्यायाने शहरातील वाहतूक कोंडीत कमी भर पडते. मुंबईत दिसणारे हे चित्र इतर शहरांतही आहे; परंतु नऊनंतर पाचवीपर्यंतचे वर्ग भरण्याची सक्ती झाल्यास ही घडी विस्कटण्याची भीती आहे.