ऑनलाइन लोकमत -
लातूर, दि. 19 - अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याच्या निषेधार्थ सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात असताना मंगळवारी लातुरात या घटनेला हिंसक वळण लागले. तालुक्यातील भोईसमुद्रगा (ता़जि़लातूर) येथे छावाच्या कार्यकर्त्यांनी १२ वाजण्याच्या सुमारास बस जाळली. दरम्यान, लातूरात या घटनेचे पडसाद उमटू नये म्हणून छावा संघटनेच्या १५ ते २० कार्यकर्त्यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे.
कोपर्डी येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याच्या निषेधार्थ सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. त्याच घटनेच्या निषेधार्थ लातुरातही सर्वपक्षीय बंदचे आवाहन करण्यात आले होते. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास छावा संघटनेच्या पदाधिका-यांकडून बाजारपेठ, शाळा, महाविद्यालये बंद करण्याचे आवाहन केले जात होते.
दरम्यानच्या कालावधीत पोलिसांनी सर्वपक्षीय १५ ते २० कार्यकर्त्यांना अटक केली. त्यातच काही संतप्त झालेल्या पदाधिका-यांनी लातूर तालुक्यातील भोईसमुद्रगा गावाजवळ एमएच २० बीएल ०१९४ क्रमांकाची लातूर ते कळंब जाणारी बस थांबवून आतील प्रवाशी उतरवून पेट्रोल टाकून बस जाळली. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधिक्षक शिवाजी राठोड, पोलिस उपाधिक्षक लता फड, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोनि सुधाकर बावकर यांनी घटनास्थळी भेट देवून घटनेचा पंचनामा केला.
महामंडळाच्या बसेस स्थानकातच
या घटनेची तीव्रता वाढत असल्याने लातूर आगारातील शंभर ते सव्वाशे बसेस बसस्थानकातच लावण्यात आल्या होत्या. सकाळच्या टप्प्यातील सर्वच बसेस रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय झाली असल्याचे स्थानक प्रमुख बलभीम पाटील म्हणाले.
चालकांना जबरीने उतरविले
भोईसमुद्रगा येथे बस जाळण्याचा प्रयत्न करणा-या कार्यकर्त्यांना चालक एस़बी बारकुल यांनी ही माझी लक्ष्मी आहे़ जाळू नका अशी विनंती करूनही छावाच्या पदाधिका-यांनी त्याला उतरवून बस जाळली असल्याचे चालक म्हणाले
शहरात कडकडीत बंद
लातूर शहरात छावा आणि ईतर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पुकारलेल्या बंदला कडकडीत बंदचा प्रतिसाद मिळाला. ८० टक्क्याहून अधिक दुकाने व बाजार दुपारपर्यंत बंद होता. शाळांनी मुलांना सुट्टी देवून टाकली. नुकसानीच्या भितीने आगार प्रमुखांनीही शहराच्या बाहेर बसेस सोडल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.
शहराला आले छावणीचे स्वरूप
कार्यकर्त्यांनी पुकारलेल्या आजच्या बंदमुळे शहरातील गंजगोलाई, शिवाजी चौक, बार्शी रोड, औसा रोड, अंबाजोगाई रोड, नांदेड रोड या सर्व प्रमुख मार्गावर पोलिस बंदोबस्त होता. चौका चौकांनी पोलिसांचे ताफे तैणात करण्यात आले होते. त्यामुळे शहराला छावणीचे स्वरुप आले होते.