- हरीश गुप्तानवी दिल्ली : केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या स्टार्टअप कंपन्यांच्या स्थापनेत महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात त्यांची संख्या २०२१ मध्ये ३,७२१ वर पोहोचली आहे. २०२० मध्ये अशा मान्यताप्राप्त स्टार्टअपची संख्या २,६८५ होती. २०२१ मध्ये त्यात ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मार्च २०२२ पर्यंत भारतातील एकूण मान्यताप्राप्त स्टार्टअप कंपन्यांची संख्या १४,००० इतकी होती. यातील सर्वाधिक कंपन्या महाराष्ट्रात आहेत. २०२१ मध्ये स्टार्टअप्सची स्थापना करण्यात पुणे देशात अव्वल ठरले आहे.
औरंगाबाद, नाशिकची आगेकूच औरंगाबादमध्ये २०२० मध्ये केवळ ४० स्टार्टअप कंपन्या कार्यरत होत्या. ही संख्या १०० टक्क्यांपेक्षा अधिक वाढीसह ८५ झाली आहे. १२२ स्टार्टअपसह नाशिक हे एक केंद्र म्हणून उदयास आले तर, मुंबई उपनगरांत २८७ कंपन्या आहेत.
देशात ६५,८६१ एकूण स्टार्टअपमार्च २०२२ पर्यंत भारतात कार्यरत एकूण स्टार्टअप कंपन्यांची संख्या ६५,८६१ असली तरी, त्या सर्वांना वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (डीपीआयआयटी) द्वारे मान्यता मिळालेली नाही. तथापि, गेल्या सहा वर्षांत त्यांची वाढदेखील अभूतपूर्व झाली आहे. २०१६-१७ मध्ये अशा कंपन्यांची संख्या ७२६ होती. मोदी सरकारने १६ जानेवारी २०१६ रोजी स्टार्टअप इंडिया उपक्रम सुरू केल्याने ही संख्या झपाट्याने वाढली आहे.