- लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जीएसटी लागू झाल्यानंतर प्रामाणिकपणे व्यवसाय करणारेच टिकू शकतील. बिलिंगविना नंबर दोनमध्ये व्यवसाय करण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकते, अशी व्यापारी वर्तुळात चर्चा आहे. नंबर १ मध्ये व्यवसाय करणारे जसे अनेक व्यापारी आहेत तसेच नंबर २ मध्ये (कोणताही कर न भरता विनाबिलिंगचा व्यवसाय) करणारेही काही कमी नाहीत. मात्र, आता बिनाबिलिंगचा व्यवसाय करणाऱ्यांवर ‘गदा’ येणार आहे. कारण नवीन जीएसटी प्राणालीत त्यास थाराच नाही. तुम्ही व्यावसायिक आहात व समोरच्यांकडून काही वस्तू खरेदी करीत आहात तर तो समोरचा व्यक्ती जीएसटीएनमध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. ही पहिली अट असणार आहे. कारण प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत व्यावसायिकांना मागील महिन्याच्या खरेदी-विक्रीची आकडेवारी जीएसटीएन पोर्टलवर टाकावी लागणार आहे. येथे खरेदी-विक्रीची आकडेवारी जुळली तरच पोर्टलवर माहिती पुढे जाईल. जर एखाद्या व्यापाऱ्याने अनोंदणीकृत व्यापाऱ्यांकडून काही साहित्य खरेदी केले तर त्या खरेदीदारालाच खरेदीवर कर भरावा लागेल एवढेच नव्हे तर त्यास नंतर विक्रीवरही कर भरावा लागेल. ज्यांची उलाढाल ५० लाखाखाली आहे, त्यांना त्रैमासिक विवरण आॅनलाईन भरावे लागणार आहे. ज्यांची उलाढाल ५० लाखांच्या वर आहे, अशांना मासिक विवरण भरावे लागणार आहे. मासिक विवरण दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत भरावे लागेल. आॅनलाईन विवरण भरण्यासाठी प्रत्येक व्यापाऱ्याकडे संगणक असणे आवश्यक असणार आहे. तसेच जीएसटीच्या दृष्टीने सॉफ्टवेअरही विकत घ्यावे लागणार आहे. दुकानात येणाऱ्या प्रत्येक मालाची व दुकानातून विक्री होणाऱ्या प्रत्येक मालाची बिलिंग करावी लागणार आहे. तसेच प्रत्येक मालावर, साहित्यावर विशिष्ट प्रकारच्या बारकोडचे लेबल लावावे लागणार आहे. साखर, सुकामेवा, गरम मसाला, खाद्यतेल, फळ आदींमध्ये मोठ्या प्रमाणात बिनाबिलिंगचा व्यवसाय होत असतो. मात्र, आता तोही नंबर वनमध्येच व्यवसाय करावा लागणार आहे. बिल न देता कोणालाही साध्या चिठ्ठीवर हिशोब लिहून देता येणार नाही. विवरणात काही त्रुटी राहिल्या तर त्या संबंधित व्यापाऱ्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. शिवाय शिक्षाही होऊ शकते. यामुळे बिनाबिलाचा व्यवहार करणाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.