अमरावती : तोतया पोलीस असल्याचा बनाव करीत व्यापाऱ्याची रोकड लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला गुरुवारी यश आले. पोलिसांनी टोळीच्या मास्टर मार्इंडसह ११ आरोपींना अटक केली आहे.शिवराम सोनबावने (४४), रघुनाथ आनंद इंगळे (५५), किशोर हरीदास शंभरकर (३२), नरेश हरीदास शंभरकर (३०), संजय सुरेश गावंडे (२९), मनोज महादेव वानखडे (२५), भूषण चेंडकापुरे (१९) सुमीत दत्तुपंत आठवले (४४), अंशुल अशोक डोंगरे (२२), प्रदीप शंकर गायकवाड (३३), माणिक शंकर आठवले (५०) अशी आरोपींची नावे आहेत.पुलगाव येथील शेख रऊफ हे भांड्याचे व्यापारी आहेत. त्यांच्याकडे रघुनाथ इंगळे हा कामाला होता. सोमवारी किशोर शंभरकरने इंगळेला मोबाइलवर संपर्क साधला. सुमीत आठवले व नरेश शंभरकर यांच्याकडे हवाल्याची मोठी रक्कम असून, रक्कम दुप्पट करण्याचे आमिष इंगळेला दिले. यावर विश्वास बसावा म्हणून किशोरने शेख रऊफ व इंगळे यांना शंभर रुपयांच्या नोटांचे एक बंडल आणून दाखविले होते. खात्री पटल्यानंतर रऊफकडून २ लाख रुपये घेऊन त्यामध्ये पैसे दुप्पट करण्यासाठी शंभरकरने ९० हजार रुपयांची रोकड टाकली. त्यानंतर रघुनाथ, रऊफ व किशोर हे दोन दुचाकीने राजुरवाडीत पोहचले. तेथे टोळीचा मास्टर मार्इंड शिवराम सोनबावने हा विशाल नावाने एजंट बनून आला. रऊफ यांच्याकडील २ लाख ९० हजारांची रोकड असलेली बॅग घेतली. त्यानंतर शेख रऊफ यांना घेऊन शिवराम हा दुचाकीने तिवसा येथे जाण्यासाठी निघाला होता. त्यांच्यामागे काही अंतरावर रघुनाथ व किशोर हे दुचाकीने निघाले होते. राजुरवाडी - तिवसा मार्गावर पोहोचताच त्यांच्या मागून टाटा सुमोमध्ये पोलिसांच्या गणवेशात अंशुल डोंगरे, सुमीत आठवले, नरेश शंभरकर, संजय गावंडे, मनोज वानखडे, प्रदीप गायकवाड, माणिक आठवले व भूषण चेंडकापुरे हे आले. त्यांनी रऊफ यांची दुचाकी अडवत सोनबावनेला मारहाण करुन गाडीत बसविले. त्यानंतर पैशाची बॅग घेऊन आरोपींनी पोबारा केला. हे पोलीस तोतया असल्याचे लक्षात येताच रऊफ यांनी तिवसा पोलिसात तक्रार दिली़ (प्रतिनिधी)
तोतया पोलिसांच्या टोळीचा पर्दाफाश
By admin | Published: July 18, 2014 2:43 AM