Jitendra Awhad Ajit Pawar: 'हा माणूस नशीबवान आहे. सगळे होऊन सुद्धा दादा (अजित पवार) छातीचा कोट करून उभे आहेत', असे म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना उपरोधिक टोला लगावला आहे. धनंजय मुंडेंच्या मुद्द्यांवरून आव्हाडांनी राष्ट्रवादी एकत्र असताना दोन-तीन घटना सांगत काही गौप्यस्फोट केले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडेंवरील आरोपांच्या मुद्द्यावरून अजित पवारांना घेरले.
मी किती कमनशिबी आहे -जितेंद्र आव्हाड
आमदार जितेंद्र आव्हाडांनी एक पोस्ट केली आहे. ते म्हणाले, "पण हा माणूस नशीबवान आहे. सगळे होऊन सुद्धा दादा छातीचा कोट करून उभे आहेत. मी किती कमनशिबी आहे."
आव्हाडांनी 2019 मध्ये म्हणजेच महायुतीचे सरकार सत्तेत असतानाच एक किस्साही सांगितला आहे. ते म्हणाले की, "२०१९ मंत्री झालो. पालकमंत्रिपदासाठी चढाओढ सुरू झाली. मला पालघर जिल्हा मिळेल, असे मला वाटत होते; पण... एकनाथ शिंदे साहेबांनी मला बाजूला घेऊन सांगितले की दादा रायगड जिल्हा सोडत नाहीत. माझे ३ आमदार आहेत, ते पण हट्ट धरून बसले आहेत. पालघर घ्या रायगड सोडा आणि दादांनी मला सांगितले शिंदे साहेब पालघर सोडत नाहीत", असा गौप्यस्फोट जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांबद्दल केला.
आव्हाड म्हणाले, "अशा खूप जखमा आहेत"
पुढे आव्हाड म्हणाले, "सत्य देवाला माहीत पण मी काही पालकमंत्री होऊ शकलो नाही. मग मी साहेबांमुळे सोलापूरचा पालकमंत्री झालो आणि मला कोरोनाची लागण झाली. काही तासात मला काढून भरणे मामांना जबाबदारी मिळाली. दादा थोडे दिवस थांबले असते तर… अशा खूप जखमा आहेत. पण कधीच हिशोब दिला नाही की मी हे केले मी ते केले", असे म्हणत आव्हाडांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
"२००४ ते २०१४ जेव्हा कोणी उभे राहायला तयार नव्हते, तेव्हा सगळ्यात अवघड प्रसंगात विरोधकांशी उघडपणाने दोन हात करायचे आणि दाखले देत आरोप पलटवून लावायचो; पण कधी व्यासपीठावरून त्याचे दाखले देऊन... मीच करतो मीच करतो असे केले नाही. कदाचित दादांना हे वागणे आवडत असावे", असा टोला जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना लगावला आहे.