नितीन गडकरी यांची माहिती : दत्ता मेघे यांचा समर्थकांसह भाजपात प्रवेशवर्धा : बुटीबोरी ते सांगली आणि अमरावती ते सुरत हे मार्ग विदर्भाची हॉट लाईन आहे. येत्या काळात या दोन्ही मार्गाचे कॉक्रीटीकरणाच्या माध्यमातून चौपदरीकरण करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतुक व ग्रामविकास मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे केली.सावंगी (मेघे) येथील क्रीडा संकुलावर आयोजित प्रवेश मेळाव्यात विदर्भातील ज्येष्ठ नेते माजी खासदार दत्ता मेघे, माजी आमदार सागर मेघे, समीर मेघे यांनी आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. तत्पूर्वी दत्ता मेघे यांच्या हस्ते विदर्भातील हंसराज अहीर, रामदास तडस, नाना पटोले, संजय धोत्रे व अशोक नेते या नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार करण्यात आला. ना. गडकरी पुढे म्हणाले, विदर्भ विकासाला गती मिळावी. विदर्भात उद्योग उभे राहिले पाहिजे. रखडलेले १ लाख ८० हजारांचे प्रकल्प मार्गी लावायचे आहे. देशाचे महत्त्वाचे खाते आपणाकडे असून रेल्वे बोर्ड, विमान वाहतूक, रस्त्यांच्या कामांना गती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली आहे. यामाध्यमातून विदर्भातील विकासाला चालना देण्याचे काम पुढील काळात होईल. यावेळी आ. फडणवीस म्हणाले, दत्ता मेघे यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे पक्ष बळकट झाला आहे. त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान होईल, असे स्पष्ट केले.माजी. खासदार दत्ता मेघे यांनी आपला कोणालाही व्यक्तीश: विरोध नाही. मात्र वर्धा जिल्हा काँग्रेसमुक्त करायचा आहे. यापुढे भारतीय जनता पक्षाच्या ध्येय धोरणाचा अवलंब करणार आहे. पक्षश्रेष्ठींचे आदेश प्रामामिकपणे मानणार आहे. विदर्भाचा विकास हेच आपले ध्येय असल्याचे सांगून पक्षाकडे कोणतीही अपेक्षा नसल्याचे पुन्हा एकवार स्पष्ट केले. व्यासपीठावर माजी खा. सुरेश वाघमारे, आ. दादाराव केचे, आ. किशोर सोले, आ. सुधाकर देशमुख, आ. विकास कुंभारे, आ. कृष्णा पोफळे, आ. विजय घोडमारे, माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड, माजी आमदार गिरीश गांधी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे,सागर मेघे, समीर मेघे, डॉ. पंकज भोयर, जि.प. सदस्य विलास कांबळे, मिलिंद भेंडे यांच्यासह अन्य मान्यवर विराजमान होते.(जिल्हा प्रतिनिधी)खासदारांनी केला वेगळ्या विदर्भाचा आवाज बुलंदविदर्भात शेतकरी आत्महत्या होताहेत. सिंचनाचे प्रश्न रेंगाळले आहे. बेरोजगारांचा प्रश्न यासह अनेक गंभीर प्रश्न आ वासून उभे आहेत. जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही, तोपर्यंत विदर्भाला न्याय मिळणार नाही. आता खऱ्या अर्थाने वेगळा विदर्भ करण्याची वेळ आली आहे, असा सूर काढत विदर्भातील खासदारांनी वेगळ्या विदर्भाचा आवाज बुलंद केला. भंडाराचे खासदार नाना पटोले यांनी वेगळ्या विदर्भाची भूमिका मांडत घोषणा दिली. त्यांच्या या मागणीला इतर खासदारांनीही बळ देत वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, अशी एकमुखी मागणी करीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या.
बुटीबोरी-सांगली व अमरावती-सुरत मार्ग चौपदरी
By admin | Published: July 06, 2014 12:46 AM